राज्यपालांच्या हस्ते पद्म पुरस्कार विजेत्यांचा सन्मान
मुंबई : यंदा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या राज्यातील पद्म पुरस्कार विजेत्यांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला
.
वसंतराव नाईक कृषी संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्यावतीने या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राज्यपालांच्या हस्ते उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक (पद्मभूषण), ज्येष्ठ चित्रपट निर्माते दिग्दर्शक राजदत्त (पद्मभूषण), ‘मुंबई समाचार’चे अध्यक्ष होर्मुसजी कामा (पद्मभूषण), ‘जन्मभूमी’चे संपादक कुंदन व्यास (पद्मभूषण), मल्लखांबचे प्रचारक व प्रशिक्षक उदय देशपांडे (पद्मश्री), ग्रामीण – आदिवासी भागात निःशुल्क नेत्रचिकित्सा देणारे डॉ. मनोहर डोळे (पद्मश्री), अंजुमन ई इस्लाम संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी (पद्मश्री) व नागपूर येथील मज्जाविकार तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांचा राज्यपालांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
नंदुरबार येथील पिंप्राणी येथे नदीत पडलेल्या आपल्या भावांचे जीव वाचवल्यानंतर वीरमरण आलेल्या १२ वर्षाच्या आदित्य विजय ब्राह्मणे याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मरणोपरांत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दिवंगत आदित्यच्या शौर्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते त्याच्या लहान भावाला यावेळी सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले, कार्याध्यक्ष अविनाश नाईक, आमदार निलय नाईक, आमदार इंद्रनील नाईक, विश्वस्त मुश्ताक अंतुले, दीपक पाटील व निमंत्रित उपस्थित होते.