MH 13News Network
शहरातील साईराज हणमे याची चायनीज थायपे येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशाबद्दल शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने आज साईराज याचा त्याच्या आई-वडिलांसह सन्मान करण्यात आला. शिवछत्रपतींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे, नक्कीच यशस्वी होणार अशा शुभेच्छा अध्यक्ष नानासाहेब काळे यांनी यावेळी दिल्या.
डाळिंबीआड या ठिकाणी असलेल्या शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या भव्य कार्यालयात आज सायंकाळी सत्कार समारंभ पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अभिवादनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. महामंडळाचे पदाधिकारी प्रीतम परदेशी, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे यांनी आपल्या भाषणात साईराज यास शुभेच्छा देऊन सोलापूरकरांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
सकल मराठा समाजाचे नेते तथा महामंडळाचे ट्रस्टी राजन भाऊ जाधव यांनी हा सत्कार आमच्याच कुटुंबातील लेकराचा असल्याची भावना व्यक्त केली. महामंडळातर्फे सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
सोनीपत हरियाणा येथे झालेल्या आशियाई युथ चॅम्पियन्सशीपसाठी झालेल्या निवड चाचणीमध्ये उत्तर मतदारसंघातील क्रीडा खेळाडू साईराज हणमे याने भारतीय संघात प्रथम क्रमांक तसेच देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
देशामध्ये प्रथम रँकवर असणारा सोलापूर जिल्हामधील साईराज हणमे हा पहिलाच धनुर्धर आहे.
आज शहरात सकाळपासून पाऊस सुरू आहे असे असतानाही महामंडळाच्या वतीने ट्रस्टी मंडळी शुभेच्छासाठी उपस्थित राहिली. साईराज यास मानाचा फेटा बांधून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी राजनभाऊ जाधव, प्रीतम परदेशी, मोहन खमीतकर, मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, देविदास घुले, विनायक भोजरंगे, सुधीर गावडे, प्रसिद्धीप्रमुख वैभव गंगणे आदी मान्यवर उपस्थित होते.