MH 13 NEWS NETWORK
शिवस्मारकतर्फे ‘गाणारे दगड बोलणारे पाषाण’ प्रदर्शन : सोलापूरकरांनी भेट देण्याचे आवाहन
सोलापूर : प्रतिनिधी
रांगेने ठेवलेले आठ दगड…. त्या दगडांवर हातोडीने हलकासा प्रहार केल्यास उमटत आहेत सा रे ग म प ध नी सा चे स्वर. ही किमया मंगळवारी सोलापूरकरांनी अनुभवली

.
छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारकतर्फे शिवस्मारकच्या प्रांगणात आयोजित केलेल्या तीन दिवसीय ‘गाणारे दगड बोलणारे पाषाण’ या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवारी शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी व्यासपीठावर शिवस्मारकचे सचिव गंगाधर गवसने, कोषाध्यक्ष धनंजय कुलकर्णी, संचालक प्रा. देवानंद चिलवंत, प्रसाद जिरांकलगीकर, व्यवस्थापक मल्लिनाथ व्हटकर, प्रदर्शनाचे संकलक प्रभाकर कुंटे उपस्थित होते.
मोरेश्वर कुंटे आणि विजया कुंटे यांनी पाहिलेल्या महाराष्ट्रातील तब्बल १८ हजार मंदिरांपैकी आगळ्यावेगळ्या अविस्मरणीय मंदिरांच्या छायाचित्रांचे हे प्रदर्शन आहे.
वाशिम जिल्ह्यातील तीर्थ शिरपूर येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथजी मंदिरातील भगवान महावीरांची अधांतरी मूर्ती, नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील श्री रेणुका माता मंदिरातील हलत्या दगडी दीपमाळा, शिखर शिंगणापूर येथील श्री महादेव मंदिरातील सभा मंडपातील हलता दगडी खांब, बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुरजन गावातील पालथे मंदिरात असलेल्या तरंगणाऱ्या विटा, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील आंबडी येथील श्री वाळकेश्वर मंदिरातील कुंडाच्या कडेला उभे राहून टाळ्या वाजवल्या असता उसळी मारून वर येणाऱ्या पाण्याचे चमत्कारिक कुंड यांची छायाचित्रे तर कर्नाटकातील होट्टल येथील मंदिरातून देगलूर तालुक्यात आणण्यात आलेले सा रे ग म प ध नि सा स्वर वाजणारे दगडही या प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत.
गुरुवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून दररोज सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत शिवस्मारक येथे हे प्रदर्शन पाहण्यास मोफत उपलब्ध आहे. सोलापूरकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवस्मारकतर्फे करण्यात आले आहे.