MH 13News Network
आरटीई प्रवेश प्रक्रिया ताबडतोब सुरू करण्याची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची मागणी
आर्थिक दुर्बल घटकासाठी शाळांमध्ये शासनाने 25% जागा राखीव ठेवलेले आहेत. या जागांची प्रवेश प्रक्रिया साधारणपणे जानेवारी मध्ये सुरू होत असते. जानेवारी संपून फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा संपत आला तरी देखील यावर्षीच्या प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू झालेल्या नाहीत. याची दखल घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने आरटीई प्रवेश प्रक्रिया ताबडतोब सुरू करण्याची मागणी जिल्हा प्रशासनाला केली आहे.
यंदाच्या वर्षीची आरटीई प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरू झाली नसल्याने पालक वर्ग हवालदिल झालेला आहे. आपल्या मुलांना चांगल्या शाळेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पालक कर्ज काढून किंवा हात उसने पैसे घेऊन प्रवेश घेत आहेत .
प्रवेश घेतल्यानंतर आरटीई मध्ये जर प्रवेश मिळाला तर प्रवेश घेतलेल्या शाळा शुल्क परत देण्यास टाळाटाळ करतात. यामुळे पालकांचे आर्थिक नुकसान होत आहे. या सर्व बाबीचा विचार करूनच शासनाने आरटीई प्रवेश प्रक्रिया ताबडतोब सुरू करावी ही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आली.
या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी सोलापूर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना देण्यात आले. यावेळी राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, उपजिल्हाध्यक्ष राहुल अक्कलवाडे, जिल्हा सचिव अक्षय आडम व इतर पदाधिकारी उपस्थित होते.