पालघर, दि. १७ :- सूर्या प्रकल्पाचे पाणी मीरा भाईंदरच्या दिशेने नेण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या वर्सोवा पुलाखालील बांधकामाच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेचे बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि भारतीय लष्कराच्या एमईएस यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि एल ॲण्ड टी कंपनीला दुर्घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव कार्य करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्घटना स्थळाची पाहणी करताना दिले होते.
सद्य:स्थितीमध्ये शाफ्टमधून मलबा काढण्यासाठी शाफ्टच्या कोपऱ्यांना व भिंतींना मजबूत करण्याचे काम चालू आहे.
तसेच शाफ्टच्या आतील काँक्रीट तोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. विहिरीच्या भोवतालचा दबाव कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून जिल्हा प्रशासनामार्फत बचाव कार्यावर देखरेख सुरु आहे.
घटनास्थळी भारतीय लष्कर (Army), राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल – NDRF, अग्निशमन दलाच्या तुकड्या या ठिकाणी कार्यरत आहेत. दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरु आहे.
जिल्हधिकारी गोविंद बोडके हे बचाव कार्याचा सतत आढावा घेत आहेत.