शाहिरी कला जपली पाहिजे – चंद्रकांत फाटेसोलापूर,(प्रतिनिधी):- छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली शाहिरी परंपरा सध्याच्या काळाच्या ओघात लोप पावत चाललेली आहे. वीरांचे स्फुरणगाणं म्हणजे शाहिरी कला आहे. ही कला सध्याच्या आधुनिक युगामध्ये जपणं ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे मत मोहोळचे शाहीर कै.भाई विश्वासराव फाटे यांचे चिरंजीव चंद्रकांत फाटे यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने महाराष्ट्राच्या समृद्ध शाहिरी परंपरेचा गौरव करणाऱ्या ‘शाहिरी महोत्सवा’चे आयोजन सोमवारी हुतात्मा स्मृती मंदिर येथे करण्यात आले होते. या शाहिरी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी फाटे हे बोलत होते. यावेळी अनंत जोशी ,नगरसेवक सात्विक बडवे महाराष्ट्र शासनाच्या माहिती व संचालनालय विभागाचे सदाशिव खैरे संयोजक अमोल धाबळे, प्रशांत बडवे, ज्येष्ठ साहित्यिका नशिमा पठाण, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जळगाव येथील शाहीर वेदराज कपाटे, अशोक पाटील, उमेश पाटील, जितेंद्र भांडारकर, उमेश भांडारकर, शिवाजीराव धर्मा पाटील ,योगेंद्र राऊळ , भूषण शरद पवार, बाळकृष्ण पाटील यांनी आपली शाहीरी कला सादर केली.प्रारंभी या कार्यक्रमाचे समन्वयक अमोल धाबळे यांनी प्रास्ताविक करून शाहिरी महोत्सवाची माहिती सांगितली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि वाद्य पूजन करून महोत्सवाचा शुभारंभ झाला.शाहिरांच्या वारसदारांकडून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.सोमवार ,मंगळवार, बुधवार, असे तीन दिवस दररोज सायंकाळी ७.०० वाजता शाहीरी महोत्सव सादर होणार आहे. या महोत्सवातून महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी, सामाजिक प्रबोधनाशी आणि राष्ट्रभक्तीच्या भावनेशी नाते सांगणाऱ्या शाहिरी कलेचा जागर मांडला जाणार आहे. हा कार्यक्रम माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी सोलापूरच्या रसिकाकरिता आयोजित केलेला आहे.महाराष्ट्राची शाहिरी परंपरा ही केवळ मनोरंजनाची लोककला नसून, इतिहास, शौर्य, पराक्रम, सामाजिक प्रबोधन, राष्ट्रभक्ती आणि लोकभावना व्यक्त करणारे प्रभावी सांस्कृतिक माध्यम आहे. पोवाडे, लावण्या आणि विविध शाहिरी काव्यप्रकारांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा इतिहास, वीरपुरुषांचे कार्य, सामाजिक जीवन आणि जनजागृतीचे विचार पिढ्यान्पिढ्या जनमानसात पोहोचविले गेले आहेत. ओजस्वी शब्दरचना, प्रभावी कथन, लयबद्धता आणि उत्स्फूर्त सादरीकरण अशी शाहिरी पर्वणी सोलापूरकरांना अनुभवाला मिळणार आहे.. शाहीर सूरज किरणसिंग राऊळ व सहकारी, शाहिरा मंगल दळवी व सहकारी तसेच शाहीर कल्याण काळे व सहकारी यांनी सादरीकरण केले.हुतात्मा स्मृती मंदिर परिसरात रांगोळी काढून शाहिरी महोत्सवाला आकर्षक करण्याचा प्रयत्न संयोजकाकडून करण्यात आला.







