MH13 News Network
पंढरपूर | प्रतिनिधी
आषाढी वारीसारख्या जगप्रसिद्ध आध्यात्मिक सोहळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी जिल्हा परिषद सोलापूरने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष कौतुक केले. भाविकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देत वारीचे नियोजन प्रभावीपणे पार पाडल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक, वैद्य , उपाध्यक्ष इंद्रजित पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री यांनी अभिनंदन करत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी पंढरपूर येथे आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांचे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी वारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमार्फत भाविकांसाठी राबविण्यात आलेल्या विविध सुविधा, स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, तात्पुरत्या निवास व्यवस्था, स्वच्छतागृहे, रस्ते दुरुस्ती तसेच इतर मूलभूत सुविधांच्या नियोजनाची सविस्तर माहिती घेतली.जिल्हा परिषद प्रशासनाने विविध विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधत भाविकांच्या सेवेसाठी केलेल्या नियोजनाबद्दल मुख्यमंत्री यांनी समाधान व्यक्त केले.

लाखो वारकऱ्यांना कोणताही मोठा अडथळा न येता सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी विशेष कौतुक केले.यावेळी उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेल्या कौतुकामुळे जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक जोमाने व सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून काम करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त केली.
भविष्यातही नागरिकाभिमुख आणि लोकहिताची कामे अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, आषाढी वारीतील उत्कृष्ट नियोजन आणि प्रभावी प्रशासकीय कामगिरीबद्दल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचाही पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.याप्रसंगी आमदार समाधान आवताडे, आमदार राजेंद्र राऊत, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शहाजी पवार, भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनायक सुतार तसेच जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.








