महेश हणमे /9890440480
मराठा समाजास 10% आरक्षणाचा परीपूर्ण लाभ मिळण्याकरीता पोलीस भरती प्रक्रिया आणि नीट परिक्षा प्रवेशाच्या कालावधीमध्ये वाढ होण्याची मागणी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज शुक्रवारी केली आहे. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी शहरातून शिंदे तर ग्रामीण जिल्ह्यातून राऊत पुढे सरसावले आहेत.
राज्यामध्ये नीटची प्रवेश प्रक्रिया (वैद्यकीय महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया) सुरू असून त्याचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख उद्या शनिवार 9 मार्च आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात 10% आरक्षणाचा मराठा विद्यार्थी व विद्यार्थीनींना लाभ मिळत नाही. तसेच पोलीस भरतीची प्रक्रिया राज्य सरकारने सुरु केलेली आहे. या प्रक्रियेमध्ये 10% मराठा आरक्षण लागू केलेला असून, एसईबीसीचे प्रमाणपत्र काढण्याचा कालावधी हा 12 दिवसाचा आहे, तसेच नॉन क्रिमिलियरचे प्रमाणपत्र काढण्याचा कालावधी हा पण किचकट व वेळखाऊ आहे. यामुळे नीट आणि पोलीस भरतीची कालावधीमध्ये वाढ होण्याकरीता शहर, जिल्ह्यातील काही मराठा विद्यार्थ्यांनी सकल मराठा समाजाकडे तसेच आमदार प्रणिती शिंदें, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे निवेदन दिलेले आहे.
राज्य सरकारने दिलेले मराठा आरक्षण हे गरजवंत मराठ्यांना मान्य नसल्याचा दावा मराठ्यांचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. सद्य स्थितीत राज्यातून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद ही राज्य सरकारची डोकेदुखी ठरत आहे. सोलापूर जिल्ह्यातील वैराग, मोहोळ, शेटफळ येथील मराठ्यांच्या संवाद बैठकांचे रूपांतर मोठ्या जाहीर सभेत झाले. त्यामुळे पुन्हा एकदा आरक्षणाचा लढा उभा करत असल्याचे चित्र राज्यात प्रकर्षाने दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेली पोलीस भरती तसेच नीट परीक्षा यातील गंभीर त्रुटी सकल मराठा समाजाने शासनासमोर निवेदनाद्वारे मांडलेल्या आहेत.
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि शहर मध्यच्या काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे या आरक्षणाचा परिपूर्ण लाभ मराठा समाजाला मिळावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
संबंधितांना आदेश व्हावेत..!
अधिवेशनामध्ये मराठा समाजास 10% आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाला असला तरी आरक्षणाचा परीपूर्ण लाभ मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी मला प्रत्यक्ष भेटून आणि निवेदन देऊन
पोलीस भरती प्रक्रिया आणि नीट परिक्षा प्रवेशाच्या कालावधीमध्ये वाढ करण्यासंदर्भात मागणी केली आहे. मी तात्काळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना संबंधितांना आदेश व्हावेत अशी मागणी केली आहे.
प्रणिती शिंदे
काँग्रेस आमदार
मराठा विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार.!
सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार यांनी पोलीस भरती, नीट परीक्षा या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले होते. मलाही फोनवरून या गंभीर त्रुटींची माहिती दिली. आज शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री अजित पवार यांना यासंदर्भात निवेदन पाठवले आहे. सोमवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मराठा आरक्षणाच्या लाभासाठी प्रत्यक्ष भेट घेणार आहे. SEBC साठी तहसीलदारांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. या संदर्भात शासन निर्णय प्रत पाठवली आहे.
राजाभाऊ राऊत
आमदार, बार्शी
पाटलांच्या आदेशानुसार पुढचे पाऊल..!
शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे तसेच बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना फोनद्वारे मराठा आरक्षणाच्या लाभांमधील गंभीर त्रुटींची माहिती दिली होती. जिल्हाधिकाऱ्यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना ईमेल द्वारे सदर निवेदन पाठवले होते. याची दखल आमदार राजेंद्र राऊत व आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली आहे. आज शुक्रवारी या दोन्ही आमदारांशी फोनवरून चर्चा झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे वरील मागणी केली आहे.आमचे नेते मनोज जरांगे पाटील यांना सदर गंभीर बाबीची माहिती दिली असून त्यांच्या आदेशानुसार पुढचे पाऊल उचलले जाईल.
माऊली पवार, नेते
सकल मराठा समाज