मुंबई शहर जिल्ह्यात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वीप समितीतर्फे विशेष उपक्रमांचे आयोजन .
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेप्रमाणे नवीन पात्र मतदारांची नोंदणी वाढवणे तसेच जिल्ह्यामध्ये लोकसभा सार्वजनिक निवडणूकीकरिता मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. संजय यादव यांच्या अध्यक्षतेखाली स्वीप (Systematic Voters Education & Electoral Participation) समिती गठीत करण्यात आली आहे. सदर स्वीप समितीतर्फे मतदारांमध्ये जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून समितीतर्फे शीव रुग्णालयाच्या सभागृहात अंगणवाडी सेविका व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यासाठी नुकतेच प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.
‘मतदारांना मतदानासाठी प्रवृत्त कसे करावे’ या संकल्पनेवर आधारित या प्रशिक्षण शिबिरात ३१० अंगणवाडी सेविका व २६२ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी सहभागी झाले. या शिबिरात प्रशिक्षणार्थींनी मंतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सूक्ष्म नियोजन कसे करावे, २०० घरातील मतदारांशी संपर्क साधून मतदानाचे कर्तव्य बजावण्यासंदर्भात कसे प्रयत्न करावे, याबाबत समितीतर्फे मार्गदर्शन करण्यात आले. अंगणवाडी, बालवाडी, सफाई मित्र, पोलीस बिट अधिकारी, शासकीय अधिकारी, सामाजिक संस्था यांनाही मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सहभागी करून घेण्याचे आवाहन या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना करण्यात आले. अंगणवाडी सेविका व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करणे, नवमतदार शोधणे, मतदानाचा हक्क बजावण्यासंदर्भातील संकल्पपत्र भरून घेणे, समूह बैठका आयोजित करणे, Ethical Voting App बाबत नागरिकांना माहिती देणे याबाबत प्रशिक्षण व माहिती समितीतर्फे यावेळी देण्यात आली. दिव्यांग व जेष्ठ नागरिकांना निवडणूक आयोगाने मतदानासाठी दिलेल्या सोयीसुविधांची माहिती संबंधितांना देण्याचे आवाहनही समितीतर्फे प्रशिक्षणार्थींना करण्यात आले. एक अंगणवाडी सेविका आणि त्यांची मदतनीस अशा दोघींनी २०० घरातील मतदारांना मतदानासाठी प्रेरित करण्याची जबाबदारी घेतली आहे. घरोघरी मतदारांशी संपर्क साधून सर्व मतदारांना घटनेने दिलेला अधिकार बजवावा, असे आवाहन करतील. झोपडपट्टीत अधिक असलेल्या मतदार संघात देखील या अंगणवाडी सेविका जाणार आहेत. अंगणवाडीतील लहान मुले आपल्या आई-वडिलांना मतदान करण्यासाठी हट्ट धरतील आणि मतदान केल्यावर त्यांच्यासोबत सेल्फी काढतील. १८ वर्ष पूर्ण झालेल्या नव मतदार यांची नोंदणी, दिव्यांग मतदार तसेच ८५ वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना मतदान करण्यासाठी साहाय्य करण्यासाठी बूथ लेव्हल ऑफिसर (BLO ) यांना संपर्क करून मदत करतील.
सदर प्रशिक्षण शिबिराला मुंबई शहर जिल्हा स्वीप समन्वय अधिकारी डॉ. सुभाष दळवी, सहाय्यक निवडणूक अधिकारी श्रीमती अश्विनी पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी (धारावी) श्री. शशी चव्हाण, तहसीलदार श्रीमती गवळी आदी उपस्थित होते.