MH 13 News Network
सोलापूरच्या राजकीय क्षेत्रातील एक बडप्रस्थ मानले जाणारे शहरातील सर्वात तरुण माजी महापौर महेश कोठे यांचे आज मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. उद्या बुधवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.
शरद पवार पक्षाचे नेते असणारे महेश कोठे हे आपल्या काही मित्रांसह प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. त्यापैकी काही मित्र कालच परतले होते.
आज मंगळवारी पवित्र असे शाही स्नान करायचे असल्याने महेश कोठे आणि काही मित्र प्रयागराज याच ठिकाणी थांबले. आज मंगळवारी पहाटे प्रयागराज येथील नदीवर स्नानासाठी पोहोचले होते सध्या या ठिकाणी गोठवणारी थंडी आहे. अशाही परिस्थितीमध्ये महेश कोठे पाण्यात उतरले, काही वेळानंतर त्यांना त्रास होऊ लागला. महेश कोठे हे अचानकपणे खाली कोसळले. सोबत असल्या मित्रांनी ताबडतोब तिथून जवळ असलेल्या एका रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. डॉक्टरांनी महेश कोठे हे मृत असल्याचे घोषित केले.
महेश कोठे यांना काही वर्षांपूर्वी हृदयविकाराचा त्रास झाला होता. त्यांच्यावर एका मोठ्या रुग्णालयात बायपास सर्जरी करण्यात आली होती. महेश कोठे यांच्या निधनाची वार्ता सोलापुरात वाऱ्यासारखी पसरली. कोठे कुटुंबीयांना भेटण्यासाठी आज सकाळपासूनच राधाश्री या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांची आणि नागरिकांची गर्दी होत आहे.
या ठिकाणी माजी नगरसेवक प्रथमेश कोठे,पुतणे आमदार देवेंद्र कोठे, डॉ. सूर्यप्रकाश कोठे, विनायक कोंड्याल, नागेश वल्याळ, कोठे कुटुंबाचे स्नेही, निकटवर्तीय, पद्मशाली समाजातील अनेक प्रतिष्ठित मंडळी, महेश कोठे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येने जमा झाला आहे. उद्या बुधवारी सकाळी 11 वाजता जुना पुणे नाका येथील स्मशानभूमीत महेश कोठे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून तत्पूर्वी बुधवारी सकाळी राधाश्री येथील निवासस्थानी अंत्यदर्शन घेता येणार आहे.
अनेक मान्यवरांनी व्यक्त केला शोक..
शहर आणि जिल्ह्यातील कोठे यांचा संपर्क मोठा असल्याने अनेकांनी आपला शोक व्यक्त केला आहे.राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते सर्वेसर्वा शरद पवार , केंद्रीय माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील,खासदार प्रणिती शिंदे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते,माढ्याचे माजी आमदार बबनराव शिंदे, रणजीतसिंह शिंदे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे,काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, युवा नेते बिज्जू प्रधाने यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.
सोशल मीडियावर अनेकांनी व्यक्त केल्या प्रतिक्रिया
महेश कोठे यांच्या मृत्यूची वार्ता शहर ,जिल्ह्यात पसरताच आज मकर संक्रांतीच्या दिवशी सुद्धा अनेकांनी आपल्या फेसबुक वॉलवर महेश कोठे यांच्या श्रद्धांजलीची पोस्ट केली आहे. अनेकांनी व्हाट्सअप स्टेटस ला भावपूर्ण श्रद्धांजली चे फोटो आणि स्टेटस ठेवले असून विनम्रपणे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
शहरातील अनेक भागात महेश कोठे यांच्या श्रद्धांजलीचे बोर्ड लावून संवेदना व्यक्त केली आहे.