MH 13 News Network
सर्वधर्मसमभाव नावाखाली वारीतील अन्य धर्मांच्या प्रचार व प्रसाराचे दिले दाखले
सोलापूर, ता.८ –
अध्यात्मातून हिंदुत्व जपण्यासाठीच शेकडो वर्षांपासून वारीची परंपरा सुरू आहे. वारीत सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली अन्य धर्माचा होत असलेल्या प्रचार व प्रसाराचे उदाहरणांसह दाखले देतानाचा सर्वांनी एका छताखाली येण्याचे आवाहन, हभप शिरीष महाराज मोरे यांनी केले.
विश्व संवाद केंद्र, पुणे यांच्यातर्फे शिवस्मारक सभागृहात सर्व जिल्ह्यातील पत्रकारांसाठी आयोजित माध्यम संवाद परिषदेत ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर विश्व संवाद केंद्र, पुणे येथील शिल्पाताई निंबाळकर, ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी भारतमातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी बोलताना शिरीष महाराज पुढे म्हणाले की वारीला हिंदू धर्मापासून दूर करण्याचे अनेकांचे प्रयत्न आहेत. सध्या वारकरी व हिंदू वेगळे असल्याची चुकीची माहिती समाजात पसरविली जात आहे. शहरी नक्षलवादाबाबत ज्यांना अटक झाली, अशांनीच ‘संविधान दिंडी’ या गोंडस नावाखाली हा प्रकार चालवला आहे. अभंगातून राजकीय विषय हाताळण्याचा प्रकार काही संस्था करत असल्याचा आरोप यावेळी महाराजांनी केला. अनेकांकडून वारीच्या अंतरंगाला हात घालून त्याचा आत्मा चोरण्याचे काम सुरू आहे. हे वेळीच थांबवण्यासाठी सर्वांनी एका छताखाली यावं, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

ज्येष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे यांनी अनेकांना वारी परंपरा माहीत नाही. त्यामुळे अध्यात्माच्या दृष्टीने वारीकडे पाहिले पाहिजे असे सांगितले. वारीच्या अश्वांना रस्ता मिळावा म्हणून हरिजन समाजाची दिंडी पुढे असते भेद म्हणून नाही, असे ठणकावून सांगितले. वारीचा आत्मा कधीच बदलला नाही. अनेकांनी तसा प्रयत्न केला, पण ते कधीही शक्य होणार नाही असे सांगतानाच, प्रत्येकाने एकदा तरी अश्वाच्या पाठीमागे व शेवटच्या दिंडीच्या आधी पायी चालून वारी अनुभवावी, असे आवाहन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रशांत देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन राहुल पावले यांनी केले.