MH 13 NEWS NETWORK
गडचिरोली… दुर्गम, वनाने वेढलेला, आदिवासी आणि मागास अशी ओळख असलेला जिल्हा. खरे तर विपुल वनसंपदा, खनिजसंपत्ती, नद्यांचा प्रदेश आणि आदिवासी संस्कृतीचे जतन करणारा यासोबतच लोकशाहीवर विश्वास ठेवणारा अशी या जिल्ह्याची ओळख असायला हवी.
लोकसभा-2024 च्या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे 72 टक्के मतदारांनी लोकशाही मूल्यांप्रती बांधिलकी दर्शवित मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य चोखपणे बजावले. मागील दोन्ही लोकसभा निवडणूकीत देखील हा मतदार संघ मतदानाच्या टक्केवारीत राज्यात अग्रेसर होता. राज्यात इतर मतदार संघापेक्षा येथील मतदानाचे प्रमाण नेहमीच सर्वाधिक राहीले आहे. उल्लेखनीय म्हणजे इतर ठिकाणापेक्षा या जिल्ह्यात मतदानाची वेळ तीन तासांनी कमी होती, यासोबत दुर्गम आणि वनांच्छादित भागातील वाहतुकीच्या अडचणी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बंडखोरांकडून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या धमक्या या सर्वांना न जुमानता तळपत्या उन्हात नागरिकांनी रांगा लावून मोठ्या संख्येने मतदान केले.
मतदारांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद दबावाला बळी न पडता मतदानाचा मूलभूत हक्क बजावण्याचा नागरिकांचा अढळ निर्धार अधोरेखित करतो. येथील भरीव मतदान हे लोकशाही प्रक्रियेवरील सामूहिक विश्वासालाही पुष्टी देते. गडचिरोलीच्या नागरिकांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत निवडणूक व्यवस्थेचे पावित्र्य राखले आहे. धमक्यांना धैर्याने झुगारून आणि आपला निवडणूक हक्क सांगून त्यांनी लोकशाहीच्या तत्त्वांप्रती आपली अतूट बांधिलकी दाखवून दिली आहे. गडचिरोलीच्या मतदारांनी दाखवलेले धैर्य आणि मतदानाप्रतिची दृढ भूमिका ही प्रतिकूल परिस्थितीत लोकशाही टिकून राहण्याचा आणि लोकांचा आवाज भीतीने किंवा जबरदस्तीने बंद करता येत नसल्याचा महत्त्वपूर्ण संदेश देते.
निवडणूक सुरळीतपणे घेण्यासाठी जिल्हा प्रशासन देखील दिवस-रात्र राबले. विशेष म्हणजे जिल्ह्याचे प्रमुख असलेले जिल्हा निवडणूक अधिकारी श्री संजय दैने हे देखील निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याच्या दोन दिवसांपूर्वीच बदलीने येथे आले होते. त्यातच निवडणुकीच्या चार दिवसांपूर्वी त्यांचे वडील वारले तरी देखील वैयक्तिक दुःख बाजूला सारून त्यांनी निवडणुकीच्या राष्ट्रीय कामात स्वतःला झोकून दिले. त्यांचा पूर्वानुभव दांडगा असल्याने निवडणूक यंत्रणेकडून त्यांनी तत्परतेने कामे करून घेतली. निवडणूक काळात जिल्ह्यात शांततापूर्ण वातावरण ठेवण्याचे महत्त्वपूर्ण आव्हान अनुभवी जिल्हा पोलिस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी लीलया पेलले. गडचिरोलीत आतापर्यंतच्या इतिहासात इतक्या शांततापूर्ण वातावरणात निवडणुका कधीच पार पडल्या नव्हत्या. यासाठी श्री निलोत्पल यांच्या मार्गदर्शनात तब्बल 16 हजार जवानांची फौज येथे जीवाची जोखीम पत्करून खडा पहारा देत होती. तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंह यांनी देखील आपल्या यंत्रणेचा पुरेपूर वापर करत ग्रामीण भागातील मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले होते.
देशात सर्वत्र लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना त्यात गडचिरोलीतील मतदारांनी धैर्य आणि अडथळ्यांना तोंड देऊन निवडणूक प्रक्रियेशी निभावलेली दृढ वचनबद्धता हा लोकशाहीवरील विश्वासाचा आणि पर्यायाने लोकशाहीचा विजयच म्हणावा लागेल.
गजानन जाधव,
जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली.