MH 13 News Network
प्रसंगी कै.संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी शेकडो तज्ञ वकील मंडळींची फौज उभी करण्याची तयारी ! – ॲड. श्रीरंग लाळे
जंगली, क्रूर आणि रानटी प्रवृत्तींना शिस्त लावण्यासाठी जगात लोकशाहीची निर्मिती झाली आणि लोकशाहीमध्ये सुद्धा पैशाच्या आणि पदाच्या जोरावर कायदे आणि नियम धाब्यावर बसवून हरामखोर रानटी प्रवृत्ती फोफावणार असतील तर जात-पात धर्म विसरून न्यायासाठी श्री. संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसोबत शेकडो वकिलांची फौज घेऊन उभे राहण्याची तयारी असल्याचा निर्धार सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील विधीज्ञ श्रीरंग लाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केला.
आज दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी मसाजोग ता. केज, जि. बीड येथे कैलासवासी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची ॲड. अक्षय राऊत ,ॲड. चैतन्य केंगार ,ॲड आकाश कापुरे आणि ॲड. श्रीरंग लाळे यांनी भेट घेतली.
भेटी दरम्यान संपूर्ण मोहोळ तालुका आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे. त्याचसोबत कायदेशीर मदतीसाठी आम्ही कोणत्याही क्षणी ठामपणे पाठीशी असल्याचा विश्वास बोलून दाखवला.
तपासामध्ये आणि चार्जशीट दाखल करण्याच्या प्रक्रियेमध्ये एकही चूक चालणार नाही. निपक्षपातीपणे आणि निडरपणे चार्जशीट दाखल होऊन तेवढ्याच तत्परतेने सर्व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सामील आरोपींना फाशीची शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे शासनाकडून आणि सर्व यंत्रणांकडून अपेक्षित आहे. -ॲड. श्रीरंग लाळे , सोलापूर