MH 13News Network
खासदार प्रणिती शिंदे यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक, जिल्ह्यातील विविध प्रश्नांचा घेतला आढावा
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विविध प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी, शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेचे प्रश्न, पाण्याचा प्रश्न याबाबतचा आढावा घेतला.
प्रणिती शिंदे यांनी खासदार होताच मतदारसंघातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचा धडाका लावला आहे. यासाठी त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी मतदासंघांतील विविध पदाधिकाऱ्यांकडून समस्या जाणून घे त्यावर उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सूचना केल्या. यावेळी प्रशासनाचे विविध विभागाचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांचा पाणी प्रश्न सोडण्याबाबतही पाठपुरावा केला. तसेच मागील आठवडाभरात सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे. तो वीजपुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात ही प्रणिती शिंदे यांनी प्रशासनात सूचना केल्या. खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना बी बियाणे आणि खते यांचा पुरवठा करण्यासंदर्भात ही त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या याचबरोबर खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळावा अशाही सूचना त्यांनी यावेळी प्रशासनास केल्या.
अतिवृष्टीमुळे नुकसान झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळणारी आर्थिक मदत ही अत्यल्प आहे. त्यामुळे जर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्यास सरसकट पन्नास हजाराची नुकसान भरपाई द्यावी अशी विनंतीही खासदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाकडे केली.
वीज पडून मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
दरम्यान यावेळी कुंभारी आणि गर्दनहळी या गावात वीज पडून मृत पावलेल्या कुटुंबीयांना प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहनही खासदार शिंदे यांनी केले.
तसेच या बैठकीदरम्यान प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडण्याच्या अनुषंगाने दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा देखील जाणून घेतला. तसेच या जलवाहिनीची प्रलंबित कामे तत्काळ मार्गी लावून पूर्णत्वास नेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. याशिवाय ग्रामीण भागात नदीकाठचा वीज पुरवठा सुरळीत करणे बाबत, शेतकऱ्यांना दूध दराचे अनुदान यासह इतर प्रलंबित मागण्या आणि समस्या सोडवण्यासंदर्भात उपाययोजना करण्याचे सूचना प्रशासनास केले आहेत. यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, सुरेश हसापुरे, अशफाक बालोरगी, शहराध्यक्ष चेतन नरोटे, सुरेश हसापुरे, बाबा मिस्त्री, शालिवाहन माने, मनोज यलगुलवार, सुलेमान तांबोळी, प्रशांत साळे, हरिष पाटील, अमर सुर्यांवशी, संदीप पाटील, राजेश पवार , मल्लिकार्जुन पाटील, आदित्य फत्तेपूरकर, अशोक देवकते, गुरू म्हेत्रे, भारत जाधव, व्यंकट मोरे, पांडुरंग जावळे, मिलिंद भोसले, रविकिरण कोळेकर, सचिन गुंड, पांडुरंग भोसले, रमेश भोसले, संदीप सुरवसे यांच्यासह मतदारसंघातील विविध वरिष्ठ पदाधिकारी, नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.