MH13NEWS network
मुंबई | 28 मे 2025:
विधानसभेनंतर शिवसेनेत प्रवेश केलेले अमर पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा विश्वास दाखवत त्यांना सोलापूर दक्षिण व अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्त केले आहे. आज मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अमर पाटील यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सहीने एक वर्ष कालावधीसाठी ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. पाटील यांचा पक्षातील झपाट्याने होणारा उत्थान हा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या रणनीतीचा भाग असल्याचे मानले जात आहे.

या नियुक्तीनंतर अमर पाटील यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली. यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेना सोलापूर संपर्कप्रमुख महेश साठे, शहरप्रमुख सचिन चव्हाण, धर्मराज बगले, अनिता माळगे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
“धनुष्यबाण पेलून दाखवणार!”

नवीन जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना नेतृत्वाने दिलेली जबाबदारी मी पूर्ण ताकदीने पार पाडणार आहे.
गाव तेथे शिवसेना, घर तेथे शिवसेना, हे ध्येय साध्य करण्यासाठी मी निष्ठेने काम करणार आहे.

”पक्ष संघटन बळकट करण्यासाठी पाऊलया नव्या नियुक्तीमुळे सोलापूर विभागात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. अमर पाटील यांच्या नेतृत्वात स्थानिक स्तरावर पक्षाची घडी अधिक भक्कम होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.