स्वच्छ सोलापूरसाठी महापालिका आयुक्तांचा दौरा – कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश
सोलापूर, दि. २८ मे २०२५ : स्वच्छ सोलापूर मोहिमेचा एक भाग म्हणून महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज ७० फूट रोड परिसरातील भाजी विक्री ठिकाणांची अचानक पाहणी केली.

या पाहणीदरम्यान रस्त्याच्या कडेला आणि विक्री ठिकाणी साचलेला कचरा दिसून आला. त्यांनी तत्काळ आरोग्य निरीक्षक व मुख्य आरोग्य निरीक्षकांना बोलावून परिसर तातडीने स्वच्छ करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

भाजी विक्रेत्यांकडून सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी अशा विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच, ७० फूट रोडवरील विक्रेत्यांना नियोजनबद्धरीत्या चिपा मार्केटमध्ये स्थलांतरित करण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना तात्काळ करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले.

यानंतर आयुक्तांनी लिब्रसी कॉलनी येथील कचरा संकलन केंद्र आणि महापालिकेच्या बेघर निवारा केंद्राचीही पाहणी केली. दोन्ही ठिकाणी स्वच्छतेची स्थिती तपासून, अधिकाऱ्यांना सुधारणा करण्याचे निर्देश दिले.
आयुक्तांनी नागरिकांना स्वच्छतेबाबत जागरूक राहण्याचे आवाहन करताना म्हटले की, “स्वच्छता ही केवळ महापालिकेची नाही, तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.”