कलिना संकुलामधील सोयी-सुविधांच्या पाहणीसाठी विधिमंडळ सदस्यांची समिती – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. 3 : मुंबई विद्यापीठ हे जगातील मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे. या विद्यापीठाचा जगात नावलौकिक आहे. विद्यापीठाच्या कलिना संकुलामध्ये मुलींसाठी वसतिगृह आहे. या वसतिगृहातील सुविधांबाबत विद्यार्थिनींच्या तक्रारी होत्या. या पार्श्वभूमीवर संपूर्ण कॅम्पसमधील सोयीसुविधा, स्वच्छता तसेच वसतिगृहातील सुविधा याबाबतची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात येईल. ही समिती कॅम्पसला भेट देऊन येथील सुविधांची पाहणी करेल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विधानसभेत आज सांगितले.
याबाबत सदस्य ॲड. पराग अळवणी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आशिष शेलार, अस्लम शेख यांनी भाग घेतला.
मंत्री श्री. पाटील म्हणाले की, अनेक विद्यापीठे आता स्वायत्त आहेत. विद्यापीठ प्रशासन, त्यांच्या व्यवस्थापनावर नियंत्रण आणण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येईल. कलिना संकुल परिसराचा विकास करण्यासाठी शासनाकडे तीन प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. याबाबत प्रस्तावाचे सादरीकरण घेऊन योग्य प्रस्तावाची निवड करण्यात येईल. त्याद्वारे या परिसराचा विकास करण्यात येईल, असेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
0000
नीलेश तायडे/विसंअ
कात्रज उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी नागरी पुनरोत्थान अभियानांतर्गत १३९ कोटी रुपये – मंत्री रवींद्र चव्हाण
मुंबई, दि. ०३ : पुण्यातील कात्रज येथील वंडर सिटी ते राजस सोसायटी चौकापर्यंत सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी राज्य शासनाने नागरी पुनरोत्थान अभियानांतर्गत १३९ कोटी रुपये पुणे महानगरपालिकेला वर्ग केले असल्याची माहिती, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितली.
याबाबत सदस्य रवींद्र धंगेकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी सदस्य नितीन राऊत यांनीही उपप्रश्न उपस्थित केला.
मंत्री चव्हाण म्हणाले, आजपर्यंत या उड्डाणपुलाचे ४० टक्के काम पूर्ण झालेले आहे. तसेच स्लीप रोडचे काम पूर्ण झालेले असून सेवा रस्त्याचे काम ९५ टक्के पूर्ण झालेले आहे. या पुलाच्या बांधकामाला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सन २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सन २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पूर्ण वेळ ट्रॅफिक वॉर्डन नेमण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि पुणे महानगरपालिकेला निर्देशित करण्यात येईल, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.