MH 13 News Network
संपूर्ण राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय मोठ्या प्रमाणावर गाजत असताना मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे आणि देशाचे लक्ष लागून राहिले आहेत. मराठा आरक्षणासाठी अनेक युवकांनी आत्महत्या केल्या असून या घटना ताज्या असतानाच सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपतींच्या पुतळ्याजवळ एका युवकाने हातावर एका धारदार वस्तूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला.





याबाबत सविस्तर हकीकत अशी..
छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक युवक हातावर धारदार वस्तूने वार करत असल्याची घटना गाडीवरून जात असताना मराठा समन्वयक विजय पोखरकर यांच्या लक्षात आली.
त्यांनी ताबडतोब सदरची घटना सोलापूरचे मराठा समन्वयक माऊली पवार तसेच राजन भाऊ जाधव यांना सांगितली.
राजन भाऊ जाधव हे तातडीने त्यांच्या कार्यकर्त्यांसमवेत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले असता त्यांना एक युवक हातावर धारदार शस्त्राने जखमा करून घेतलेल्या अवस्थेत मिळून आला. त्यांनी ताबडतोब त्याला आपल्या सोबत घेऊन पाणी दिले आणि त्या युवकाची शांतपणे समजून घातली.
मराठा आरक्षणाचा विषय जरांगे पाटील यांच्या माध्यमातून राज्य सरकारकडे पाठपुरावा केला जात आहे.सगळीकडे मराठा जागृती शांतता रॅली काढण्यात येत असून लवकरच आपल्या मागण्या मान्य होतील अशी समजूत काढली.त्याचसोबत समाज बांधवांची
आजच्या आज एक बैठक घेण्याचे आश्वासन त्या युवकाला देऊन विजय पोखरकर आणि राजन जाधव यांनी सदरची हकीकत संबंधित पोलीस खात्याला सांगितली.यावेळी देविदास घुले,दादा सुरवसे तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते.
पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन सदर युवकाला ताब्यात घेतले असून पुढील उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवले आहे.

ऋषिकेश शहाजी भोसले राहणार पुळूज तालुका पंढरपूर येथून हा युवक सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला होता. त्यास आई- वडील नाहीत .लहान भाऊ बारावीत शिकतो.घरची शेती नाही .आरक्षणासाठी तो आंदोलनामध्ये नेहमीच सक्रिय असतो अशी माहिती त्याने बोलताना दिली.
या संदर्भात मराठा समाजातील पदाधिकाऱ्यांशी तातडीने फोनवर बोलणे झाले असून उद्या तातडीने एक बैठक आयोजित करण्यात येत असून सदर घटनेची माहिती मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना फोन द्वारे सांगण्यात येईल. तसेच जरांगे पाटील यांची भेट घेऊन सदरचा प्रकार सांगण्यात येईल.
राजन (भाऊ) जाधव, मराठा समन्वयक