MH 13 News Network
बाळे परिसरात पेट्रोल पंप तसेच सीएनजी पंप उभारणीसाठी गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांचा पत्रव्यवहार..!
सोलापूर: सोलापूर शहरातील बाळे परिसरात पेट्रोल पंपाच्या अभावामुळे येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बाळे, केगाव,तसेच परिसरात असणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल अथवा सीएनजी भरण्यासाठी नागरिकांना लांब अंतर प्रवास करावा लागत आहे. यामुळे वेळेचा अपव्यय, आर्थिक बोजा आणि आपत्कालीन परिस्थितीत होणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री यांना ईमेलद्वारे पत्र पाठवले आहे.

गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी पत्राद्वारे बाळे परिसरात पेट्रोल पंप उभारण्याची गरज अधोरेखित केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “बाळे परिसरात इंधन भरण्यासाठी नागरिकांना काही किलोमीटर प्रवास करावा लागत आहे. हा प्रवास वेळखाऊ आणि खर्चिक ठरत असून, या भागातील विकासासाठी पेट्रोल पंपाची उभारणी आवश्यक आहे.
“पत्रामध्ये जाधव यांनी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या जसे की हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) किंवा भारत पेट्रोलियम (BPCL) यांना तातडीने या भागात पेट्रोल पंप उभारणीच्या सूचना देण्याची विनंती केली आहे. त्यासोबत सीएनजी पंप उभारणीसाठी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. भविष्यात याचा पाठपुरावा करण्यात येईल. अशी माहिती विजय जाधव यांनी दिली.
बाळे परिसरासाठी पेट्रोल पंप, सीएनजी पंप का आवश्यक?
लोकसंख्येची वाढ: बाळे परिसर सोलापूर शहराच्या जलद विस्तार होत असलेल्या भागांपैकी एक आहे. येथील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून, पेट्रोल पंप, सीएनजी पंप सारख्या मूलभूत सुविधा तातडीने आवश्यक आहेत.
वाहतूक व आपत्कालीन सेवा: इंधनाची सहज उपलब्धता नसल्याने आपत्कालीन सेवांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
गिरीकर्णिका फाउंडेशनचे अध्यक्ष विजय कुंदन जाधव यांनी सांगितले की, “आम्ही नागरिकांच्या हितासाठी हे पाऊल उचलले आहे. बाळे परिसरातील ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, आणि आता या भागातील लोकांची समस्या सोडवणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.”या पत्राद्वारे गिरीकर्णिका फाउंडेशनने बाळे परिसरातील नागरिकांच्या अडचणींचे गांभीर्य मांडले असून, लवकरच पेट्रोल पंप उभारणीसाठी सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
बाळे परिसरातील नागरिकांनी गिरीकर्णिका फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. “जर पेट्रोल पंप,CNG पंप उभारला गेला, तर आमच्या दैनंदिन जीवनात खूप मोठा बदल घडेल,” असे मत स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केले. आता या मागणीवर मंत्रालयाकडून पुढील पाऊल काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.