उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्यासमोर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर
सोलापूर, – सोलापूर जिल्हा हा पर्यटनासाठी खूप महत्त्वाचा जिल्हा असून येथे उजनी धरणात जल पर्यटन, 91 धार्मिक स्थळे असल्याने धार्मिक पर्यटन, कृषी क्षेत्रात अग्रेसर असल्याने कृषी पर्यटन तसेच विनयार्ड पर्यटन विकसित होण्यासाठी पायाभूत सोयी सुविधा निर्माण केल्यास जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगिण विकास होऊन येथे देश विदेशातील पर्यटकांची संख्या वाढून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्याकडे जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर केला. आराखड्यास तात्काळ उपमुख्यमंत्री यांनी तत्वत: मान्यता देऊन यासाठी सुमारे 150 ते 200 कोटीच्या निधीची तरतूद करण्यात येईल, असे सांगितले.
सोलापूर जिल्ह्याचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा सादर करताना जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की सोलापूर जिल्ह्याची भौगोलिक रचना खूप महत्त्वपूर्ण आहे. जिल्हा रेल्वे व रस्त्याने जोडलेले असून येथे महामार्गाची संख्या व दर्जा खूप चांगला आहे. हा जिल्हा मंदिराचा जिल्हा असून येथे 94 पर्यटन स्थळे आहेत. उजनी धरण निसर्गरम्य आणि पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध असून येथे अक्वॉटिक टुरिझम तसेच वॉटर स्पोर्ट टुरिझम मोठ्या प्रमाणावर विकसित होऊ शकते. उजनी धरणाचे 90 किलोमीटर लांबीचे पात्र असून येथे पर्यटकांना गोड्या पाण्याचा समुद्राचे अनुभव येऊ शकतो. उजनी धरण राष्ट्रीय महामार्गाने जोडलेले असून या ठिकाणी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे जमीन उपलब्ध आहे. तसेच या ठिकाणी जगातील सर्वात मोठा जलतरण तलाव प्रस्तावित करण्यात आलेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली.
या प्रकल्पांतर्गत उजनी धरण परिसरात पाटबंधारे विभागाच्या जागेवर मोठे पाविलियन निर्माण करण्यात येऊन यात माहिती, तिकीट केंद्र व प्रतीक्षलाय उभारण्यात येणार आहे. मनोरंजन केंद्र, हॉटेल्स, 1 हजार क्षमतेचे मोठे सभागृह, बोर्ड रूम,, रॉक पुल, सर्व वयोगटासाठी भारतातील सर्वात मोठा जलतरण तलाव, वॉटर फ्रंट डेक, लाईट हाऊस, बोट रॅम्प, मरीना बोट पार्किंग, वॉटर स्पोर्ट्स, फ्लाईंग वॉटर बोर्ड, बोट सफारी, क्रुझ सफारी, अक्वेटिक लाईफ यासह अन्य सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
आपला सोलापूर जिल्हा हा धार्मिक पर्यटनात ही अग्रेसर असून पंढरपुरचे श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरपूर येथे येत असतात. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ मंदिर व कुडल- हत्तरसंग येथील संगमेश्वर मंदिर, बार्शीतील भगवंत मंदिर यांचा ही धार्मिक पर्यटन स्थळ अंतर्गत विकास केला जात असून या ठिकाणी येणारे भाविकांची संख्या ही मोठी आहे. त्याप्रमाणे च उजनी धरण परिसर व जिल्ह्यात कृषी पर्यटनाचा लाभ घेता येऊ शकतो. यासाठी होम स्टे बैलगाडी सफारी, बफेलो राईड, स्थानिक व पारंपारिक सण साजरे करणे, लोककला, मासेमारी सह अन्य सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध करण्यात येतील. माळशिरस व करमाळा परिसरात विनयार्ड पर्यटन निर्माण केले जाऊ शकते. यामध्ये विन यार्ड, मनोरंजन, बायसिकल राईड, चीज टेस्टिंग, हॉटेल्स या सुविधा निर्माण करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. उजनी धरणाच्या पर्यटन विकास आराखड्यासाठी आमदार संजय शिंदे यांनीही सातत्याने पाठपुरावा केलेला आहे.
उजनीच्या सर्वेक्षणास 20 जून पासून सुरुवात होणार आहे. कृषी व विनयार्ड आराखडा 30 जुलै रोजी तयार होईल. प्रकल्प अहवाल व अंतिम सादरीकरण 15 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे व त्यानंतर साधारणता एक ते दीड महिन्यात प्रकल्पाला राज्य शिखर समिती ची मान्यता मिळून पुढील काळात लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होईल.
पर्यटन प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर….
सोलापूर जिल्हा हा भारतातील एकमेव असा जिल्हा आहे ज्या ठिकाणी जल, कृषी आणि ग्रामीण पर्यटन यांचे अनोखे मिश्रण असलेला जिल्हा आहे. उजनी धरण हा या पर्यटन आराखड्याचा केंद्रबिंदू आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 150 ते 200 कोटीचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देशी विदेशी पर्यटकांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. या ठिकाणी विविध व्यवसायांची निर्मिती होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणावर चालना मिळवून येथील ग्रामीण जीवनमान यांच्यात बदल घडवून त्यांची आर्थिक उन्नती साधली जाणार आहे येथील लोकांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत कायमस्वरूपी उपलब्ध होणार आहे.