MH13NEWS Network
बार्शी | प्रतिनिधी
बार्शी शहरातील सुभाष नगर येथे ६ एप्रिल २०२३ रोजी दिवसा घरफोडी करून चोरी करणाऱ्या मध्यप्रदेश येथील चार आरोपींना बार्शी न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे.
यामध्ये प्रमुख आरोपीसह तिघांना ५ ते ७ वर्षे कारावास व दंडाची शिक्षा झाली असून, चोरीचे सोने वितळवून त्याचा रवा (लगड) तयार करून विकणाऱ्या इंदौर येथील सोनारालाही ७ वर्षे कारावास व ५००० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
फिर्यादी राजकुमार काशिनाथ मांगलकर यांच्या राहत्या घरी दुपारी १.३० ते ४ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून मौल्यवान ऐवज लंपास केला होता.
बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणकडे वर्ग करण्यात आला.
तपासादरम्यान घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी हे मध्यप्रदेशातील सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना मध्यप्रदेशातून अटक करून त्यांच्या ताब्यातून चोरीचा मुद्देमाल जप्त केला.
शिक्षा झालेल्या आरोपींची नावे:

1. पवन उर्फ भुरा रामदास आर्य (३८, इंदौर) – ७ वर्षे कारावास व २००० रु. दंड
2. मनोजकुमार ठाकूरदास आर्य (३२, इंदौर) – ५ वर्षे कारावास व २००० रु. दंड
3. देवेंद्र उर्फ राज रामलाल गुर्जर (३७, इंदौर) – ५ वर्षे कारावास व २००० रु. दंड
4. दिपेंद्रसिंग उर्फ चिंटू विजयसिंग राठोर (४१, इंदौर) – ७ वर्षे कारावास व ५००० रु. दंड
दिपेंद्रसिंग राठोर हा इंदौर येथील सराफ बाजारातील व्यावसायिक असून, त्याने चोरीचे सोने वितळवून रवा बनवून स्थानिक दलालांमार्फत विकल्याचे तपासात स्पष्ट झाले.
त्यामुळे न्यायालयाने त्यालाही पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

तपास पथकाचे नेतृत्व पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांनी केले. त्यांना निरीक्षक सुहास जगताप व पथकातील इतर कर्मचाऱ्यांनी साथ दिली. न्यायालयीन कार्यवाहीत सरकारी अभियोक्ता दिनेश देशमुख यांचे मोलाचे योगदान राहिले.
“सराफ व्यापाऱ्यांना आवाहन…!
थोड्याशा लालसेपोटी चोरीचं सोने स्वीकारू नका, विकत घेऊ नका आणि विकू नका.आपल्या व्यवसायाची प्रतिष्ठा, समाजातील विश्वास आणि कायदा लक्षात घेऊन जबाबदारीने वागा.चुकीच्या मार्गाने मिळालेला नफा क्षणिक असतो, पण नष्ट झालेली इमेज कायमची असते!”