पालकमंत्री धनंजय मुंडे
जिल्ह्यातील पाणी व चारा टंचाईबाबत घेतला आढावा
बीड, :- जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बियाणे व खते यांचा माफक दरात पुरवठा होईल याची खबरदारी घ्या, असे निर्देश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या सर्वांचा आढावा पालकमंत्री मुंडे यांना यांनी आज घेतला. या आढावा बैठकीस जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब जेजुरकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी तसेच सर्व संबंधित यंत्रणांचे अधिकारी बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून सहभागी झाले.
जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस असेल अशी अपेक्षा व्यक्त करताना शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते आणि पीक कर्ज यांच्यासह केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ देण्यासाठी कृषी विभागाला निर्देश दिले आहेत, असे पालकमंत्री म्हणाले.
जिल्ह्यात कुणी खते आणि बियाणे यांची कृत्रिम टंचाई निर्माण करीत असेल किंवा चढ्या दराने विक्री करीत असेल तर त्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री.मुंडे यांनी यावेळी दिले.
बीड जिल्हा फार्मर-आयडी मध्ये देशात अव्वल आहे, ही आनंदाची बाब आहे. या फार्मर -आयडीच्या आधारे जिल्ह्यात आतापर्यंत 22 हजार शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आले आहे. त्याचा लक्षांक वाढवून आता 1 लाख पर्यंत नेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे, श्री. मुंडे यांनी सांगितले.
पीक कर्ज वाटप
जिल्ह्यात 1,707 कोटी रुपये खर्च वाटपाचे नियोजन आहे. यात 40 टक्के वाटा हा ग्रामीण बँकेचा राहील. त्यासोबतच जिल्हा मध्यवर्ती बँक देखील आता सक्षम झाली असून त्या बँकेद्वारे ही कर्ज वितरण यंदा होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा वाटा देखील 40 टक्के राहणार आहे.
पीक कर्ज नव-जुनं करताना नवे कर्ज वाटप करणे, त्यासोबतच नव्याने ज्यांनी कर्ज घेतलेले नाही अशा शेतकऱ्यांनाही कर्जवाटप होईल. राष्ट्रीयकृत बँकांचा यात मोठा सहभाग निश्चित करण्यात आला आहे. ई- केवायसी आणि थंब इम्प्रेशनच्या आधारे या बँका जिल्ह्यात 180 ठिकाणांवरून रॅली काढून 180 गावात तत्काळ वितरण करण्याचे निर्देश राष्ट्रीयकृत बँकांना देण्यात आले आहे.
चारा-पाणी
पाणीटंचाई बाबत जिल्ह्यात फारशा तक्रारी नाहीत. काही प्रमाणात चारा टंचाईच्या तक्रारी आहे. याची दखल घेऊन ज्या ठिकाणी जादा पशुधन आहे, अशा ठिकाणी चाऱ्याची उपलब्धता करून देण्यात येईल. तसेच प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तसेच गरज असणाऱ्या मंडळाच्या ठिकाणी चारा डेपो 10 दिवसात सुरू करा, अशा सूचना श्री मुंडे यांनी केल्या.
मुख्यमंत्री कापूस आणि सोयाबीन योजने अंतर्गत लाभार्थ्यांना लॉटरीद्वारे अतिशय अल्पदरात बियाणांचे वाटप देखील करण्यात येईल, याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होईल, असेही पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितले.
मनरेगांची कामे तसेच कृषी पंपांचा वीज पुरवठा आदी बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला.