MH 13News Network
मराठा आरक्षण आंदोलनात प्रभावी भूमिका बजावणारे मनोज जरांगे पाटील गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषण करत असून आज त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस असून आज त्यांची प्रकृती ढासळली होती. त्यांच्या भेटीला अनेक आमदार, खासदार गेलेले होते. काहींनी राज्यपालांना मराठा आरक्षण देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे तर खासदारांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.
आज सकाळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, मनोज जरांगे यांच्या भेटीला आले होते. त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मंत्री शंभूराजे देसाई, आमदार राजेंद्र राऊत,मंत्री संदिपान भुमरे, माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील निंबाळकर यांनी अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली तसेच उपोषण सोडण्याची विनंती केली.
दरम्यान, जरांगे पाटील यांनी एक महिन्याचा वेळ दिल्याचा शब्द दिला. ओबीसीतून हक्काचे आरक्षण द्या अशी भूमिका घेतली असून सरकारला 13 जुलै पर्यंत वेळ दिला असे जाहीर केले. महिन्याभरात मागण्या मान्य झाला नाही तर तर विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे सांगितले.
त्यांच्यानंतर शंभूराज देसाई यांनी उपस्थित असलेल्या मराठा समाज बांधवांशी संवाद साधला.
मराठा आरक्षण देण्यामध्ये जरांगे पाटील यांचे संपूर्ण श्रेय असून सरकार इतर मागण्या मान्य करण्यासाठी सकारात्मक असल्याचे देसाई यांनी उपस्थित समाज बांधवांना सांगितले. लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री संदिपान भुमरे, आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री राणा जगजीतसिंह पाटील हे उपस्थित होते.