ठाणे :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात 25 ठाणे-लोकसभा मतदारसंघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघ, स्वीप पथकाद्वारे मतदानाची टक्केवारी व मतदान जनजागृती करण्यासाठी आज एसबीआय मुख्य शाखा, ठाणे येथे मतदान जनजगृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत मतदाराना जागृत करून भारतीय लोकशाही मजबूत करणे आणि प्रत्येक नागरिकाने भारतीय लोकशाहीचा मुख्य घटक म्हणून आपला मतदानाचा मूलभूत अधिकार बजावणे, हे अत्यंत आवश्यक आहे. याविषयी बँकांमधील कर्मचारी व ग्राहक वर्ग यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात मतदान जनजागृती संबंधित घोषवाक्यांद्वारे घोषणा देण्यात आल्या. बँकेमधील कर्मचारी वर्गाने घोषणा(slogan)असलेले पोस्टर उंचावून मतदान विषयाची जनजागृती केली. बँकेमध्ये येणारा ग्राहक वर्ग मोठ्या उत्साहाने मतदान जनजगृती कार्यक्रमामध्ये सहभागी झाला होता.
मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या प्रत्येक कर्मचारी व ग्राहक वर्गाला “मी मतदान करणारच.. आपणही आपल्या मतदानासाठी सज्ज राहा..!” या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दि. २० मे २०२४ असे दर्शविणारे माहितीपत्रकाचे वितरण करण्यात आले. सर्वानी आपल्या कुटूंबातील सदस्यांना, नातेवाईकांना व तुम्ही राहता तेथील आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि सर्वांनी न चुकता दि.२० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहन सर्व कर्मचारी व ग्राहक वर्गाला करण्यात आले.
हा मतदान जनजागृती कार्यक्रम सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती.उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती. आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख श्री.सोपान भाईक यांच्या नेतृत्वामध्ये संपन्न झाला.