MH 13 NEWS NETWORK
सिंधुदुर्गनगरी,: आपत्ती व्यवस्थापन म्हणजे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींच्या वेळी जीवन आणि मालमत्तेचे संरक्षण करणे होय. नैसर्गिक आपत्ती, पूर, चक्रीवादळ, भूकंप, रोगाचा प्रादुर्भाव आणि दुष्काळ यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावते. आपत्ती व्यवस्थापन करताना कोणत्याही आपत्तीची पूर्व सूचना मिळणे खूप महत्वाचे असते ज्यामुळे होणारी हानी कमी करता येऊ शकते.
यासाठी National Disaster Management Authority म्हणजेच NDMA ने एक एप्लिकेशन म्हणजेच ॲप कार्यान्वित केले आहे. ज्याचे नाव आहे सचेत. या सचेत विषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. हे ॲप वापरण्यास अगदी सोप्पे आहे.Google App Store किंवा iOS प्रणालीवर जाऊन हे ॲप डाऊनलोड करायचे आहे. डाऊनलोड केल्यानंतर इतर ॲप प्रमाणे आपला मोबाईल क्रमांक भरून नोंदणी करावयाची आहे. त्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP क्रमांक येतो तो टाकला की आपण हे ॲप वापरू शकतो. नोंदणी केल्यावर आपण आपले लोकेशन टाकले की आपल्या परिसरातील हवामान तसेच इतर आपत्ती विषयक माहिती तात्काळ उपलब्ध होते. विशेष म्हणजे ह्या app मधील Subscribe Location मध्ये जाऊन आपण पाहिजे त्या ठिकाणचे हवामान, आपत्ती विषयक परिस्थिती जाणून घेऊ शकतो.
ह्या app मधील Disaster Survival Guide या विशेष चौकटीमध्ये (Window) गेल्यावर आपल्याला विविध आपत्ती परिस्थितीमध्ये जसे की हिमस्खलन, चक्रीवादळ, त्सुनामी, पुर, भूकंप, रासायनिक गळती, जैविक आणीबाणी काय करावे आणि काय करू नये याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे जी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. शिवाय हा app मध्ये जगामध्ये लगतच्या काळात कुठे भूकंप झाले, त्याची तीव्रता काय अशा अनेक घटकांची माहिती देखील उपलब्ध आहे. तसेच आपल्याला आपत्तीच्या प्रसंगी काही मदत हवी असल्यास ११२ क्रमांकावर संपर्क साधण्याची देखील सुविधा देण्यात आलेली आहे. सर्वांनी आपल्या मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया या ॲप विषयी….
‘सचेत’ ही प्रणाली जागतिक स्तरावर स्विकृत कॉमन अलटिंग प्रोटोकॉल (CAP) मानकांवर आधारित असून याची संकल्पना NDMA द्वारे प्रत्यक्षात आणली गेली तसेच ही योजना पूर्णतः NDMA पुरस्कृत आहे.
ही प्रणाली गृह मंत्रालय तसेच सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना त्यांच्या नागरिकांना स्थानिक भाषांमध्ये स्थान आधारित आपत्ती सतर्कतेचा संदेश प्रसारित करणे, लोकांना वेळेवर पूर्वसूचना देणे व त्या माध्यमातून जोखीम कमी करण्याची सुविधा प्रदान करते. यामुळे जीवित व वित्तहानी कमी होण्यास मदत होते.
ही प्रणाली IMD, CWC, INCOIS, DGRE, ICAR, ICMR यासारख्या अलर्ट जनरेटिंग एजन्सींना राष्ट्रीय स्तरावरील समान व्यासपीठावर एकत्रित करते. सदर प्रणाली तंत्रज्ञान सिद्धता व पायलट प्रोजेक्ट अंतर्गत तामिळनाडू राज्यात 1 वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहे. CAP – सचेत, प्रकल्पाची संपूर्ण भारतात अंमलबजावणी करण्यासाठी NDMA आणि C-DOT यांच्यात 23 ऑगस्ट 2021 रोजी सामंजस्य करार झाला आहे.
सद्यस्थितीत या प्रणालीचा पहिला टप्पा पूर्णतः कार्यान्वयित करण्यात आला असून सचेत प्रणालीच्या पहिल्या टप्या अंतर्गत Airtel, Reliance Jio, Vodafone-Idea, MTNL,BSNL या मार्फत स्थान आधारित मेसेज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याद्वारे जास्तीत जास्त नागरिकांना कमीत कमी कालवधीत आपत्तीबाबत पूर्वसूचना देणे शक्य झाले आहे. याचा वापर सामान्य व्यक्ती तसेच मच्छिमार यांना सूचना देण्यासाठी होऊ शकतो. प्राथमिक स्तरावरील पारंपारिक मोबाईल नेटवर्कचा उपयोग करून या प्रणालीचा वापर करता येतो, हा या प्रणालीचा सर्वात मोठा फायदा आहे.
‘सचेत’ या प्रणालीच्या पुढील टप्प्यात Cell Broadcast म्हणजे मोबाईलवर व्हॉइस संदेश पाठवणे तसेच रेडीओच्या माध्यमातून संदेश प्रसारित करणे, T.V च्या माध्यमातून नागरिकांना संदेश देणे तसेच भारतीय रेल्वेच्या प्रवासी माहिती उद्घोषण प्रणालीद्वारे संदेश प्रसारित करणे अशा प्रकारची यंत्रणा विकसित करण्यात येत आहे. सदर प्रकल्पासाठी (प्रणाली देखभाल खर्च) पुढील 10 वर्षाकरिता येणारा खर्च हा NDMA द्वारे केला जाणार असल्याने राज्य व केंद्रशासित प्रदेशांवर याचा आर्थिक भार पडणार नाही.
भारत सरकार, दूरसंचार विभाग यांनी सन २०२० मध्ये काढलेल्या परिपत्रकानुसार आपत्ती दरम्यान अथवा आपत्ती प्रवण भागात सबंधित प्राधिकरणाच्या निर्देशानुसार पाठवण्यात येणाऱ्या SMS अथवा Cell Broadcast याकरिता कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. आपत्ती व्यतिरिक्त कारणासाठी सदर प्रणालीचा वापर केल्यास त्यासाठी येणारा खर्च भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण व भारतीय दूरसंचार विभाग यांनी निर्धारित केलेल्या दरानुसार राज्य / केंद्रशासित प्रदेश यांना करावा लागेल.
CAP-इंटिग्रेटेड अलर्ट सिस्टमची वैशिष्ट्ये
CAP-इंटिग्रेटेड अलर्ट सिस्टम आपत्ती सूचना माहितीच्या देवाणघेवाणीसाठी जागतिक स्तरावर स्वीकृत ITU-T x.१३०३ CAP मानक आधारित प्रणाली असून या प्रणालीचा मुळ उद्देश सर्व एजन्सींना एका छत्राखाली आणणे आणि माहिती देवाण-घेवाणीमध्ये वाया जाणारा मौल्यवान वेळ वाचवणे हा आहे. या प्रणालीच्या माध्यमातून कोणत्याही धोक्यासाठी सर्व संभाव्य प्रसार पद्धतीचा वापर करून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविणे शक्य आहे. राज्यात शहरापासून ते गावापर्यंत मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने ‘सचेत’ प्रणालीचा वापर करून कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत संदेश पोहचविणे शक्य आहे.
या प्रणालीद्वारे प्रभावित क्षेत्रातील स्थानिक लोकसंख्येव्यतिरिक्त हंगामी किंवा पर्यटन लोकसंख्येला देखील समाविष्ट करून संदेश किंवा माहिती पोहोचविणे शक्य आहे. या प्रणालीचा वापर करून विशिष्ट भौगोलिक भागातील लोकसंख्येला विशिष्ट संदेश पोहोचविणे शक्य आहे. यामुळे त्याची उपयोगिता आणि प्रभावीपणा वाढण्यास मदत होते. स्थानिक जनतेला संदेशाचे अवलोकन करता यावे यासाठी स्थानिक भाषेत संदेश पाठवण्याची सुविधा उपलब्ध आहे. दृष्टिहीन व्यक्तींना संदेश पोहोचविण्यासाठी ध्वनिमुद्रित संदेश पाठवण्याची सुविधा या प्रणालीत उपलब्ध आहे.
सचेत या एकाच यंत्रणेचा वापर करून पावसासंबंधी इशारे, पूर, चक्रीवादळ, संभाव्य भूस्खलन, त्सुनामी, गारपीठ, वीज पडणे, उष्णतेची लाट थंडीची लाट अशा वेगवेगळ्या आपत्ती प्रकारांबाबत वेगवेगळ्या प्रकारचे संदेश / सूचना देणे शक्य आहे. सर्व नागरिकांना आरोग्य विषयक सल्ले, कायदा व सुव्यवस्था याबाबत सूचना प्रसारित करणे तसेच मच्छिमारांना हवामान विषयक पूर्वसूचना देणे शक्य आहे. सर्व नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी सर्व TSP (दूरसंचार सेवा प्रदाता), मोबाईल अप्लिकेशन, सार्वजनिक संकेतस्थळे, इंटरनेट ब्राउजर नोटिफिकेशन, शासकीय सोशल मिडिया, T.V. रेडीओ, बस व रेल्वे यांची सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली तसेच GAGAN, IRNSS व NavIC या सारख्या भारतीय भौगोलिक स्थिती दर्शक प्रणाली या सारख्या बहुस्तरीय यंत्रणेचा वापर या प्रणालीद्वारे केला जाऊ शकतो. या यंत्रणेच्या गैरवापरास प्रतिबंध करण्यासाठी बहुस्तरीय सुरक्षित प्रमाणीकरण आणि विश्वसनीय उपकरण यंत्रणा विकसित करण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापनाकरिता ‘सचेत’ प्रणाली वापर पुढील प्रमाणे करता येऊ शकतो
अ) आपत्ती पूर्व वापर –
१. मुसळधार / अति मुसळधार पावसाचा इशारा देणे.
२. संभाव्य पुराबाबत इशारा देणे.
३. चक्रीवादळाबाबत इशारा देणे.
४. त्सुनामीबाबत धोक्याची सूचना देणे.
५. विजेपासून होणाऱ्या जीवितहानीबाबत पूर्वसूचना देणे.
६. मच्छिमार लोकांना हवामानाबाबत पूर्वसूचना देणे.
७. निवाराकेंद्र / स्थलांतर याबाबत सूचना देणे.
८. माहितीकरिता संपर्क क्रमांक प्रसारित करणे.
ब) आपत्ती दरम्यान वापर
१. आपत्तीबाबत अद्ययावत सूचना प्रसारित करणे.
२. सुरक्षित स्थळांची माहिती देणे.
३. आपत्ती दरम्यान ‘काय करावे व काय करू नये’ याबाबत सूचना देणे.
४. मदतीकरिता संपर्क क्रमांक प्रसारित करणे,
क) आपत्ती नंतर वापर
१. मदत व पुनर्वसन या संबंधित माहिती प्रसारित करणे.
२. पूर, भूकंप, भूस्खलन अथवा इतर कारणांनी बंद झालेले रस्ते, महामार्ग, घाटमार्ग, पूल यांची माहिती देणे.