भक्तीमय वातावरणात तल्लीन भाविक
MH 13 NEWS NETWORK
श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात वातावरणात गुलाल
शेकडो भाविकांची उपस्थिती : आज प्रसाद वाटप
सोलापूर : प्रतिनिधी
फुलांनी आणि विद्युतमाळांनी सजवलेले मंदिर….. गाभाऱ्याला केलेली फुलांची रेखीव सजावट आणि श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांचा अखंड जप अशा भक्तिमय आणि भारावलेल्या वातावरणात गुरुवारी रात्री १०.४५ वाजता श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुलाल कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास शेकडो भाविकांची उपस्थिती होती.
श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या ६८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त गुरुवारी सम्राट चौक येथील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात सकाळी गुरुगीता पारायणाची समाप्ती झाली. यानंतर श्री प्रभाकर स्वामी महाराजांच्या पिंडीस रुद्राभिषेक व तर्पण विधी करण्यात आला.
यानंतर दिवसभर हजारो भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. परंपरेप्रमाणे रात्री ठीक १०.४५ वाजता गुलाल झाल्यानंतर भाविकांच्या उपस्थितीत आरती झाली. याप्रसंगी श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सार्वजनिक ट्रस्टचे चीफ ट्रस्टी मोहन बोड्डू, मॅनेजिंग ट्रस्टी बाळकृष्ण शिंगाडे, ट्रस्टी उदय वैद्य, वसंत बंडगर, वामन वाघचौरे आदी उपस्थित होते.
चौकट
आज भाविकांना लाडू प्रसादाचे वाटप
श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या ६८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त शुक्रवारी (दि. १४) दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत भाविकांना लाडूप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. यावेळी पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भाविकांनी लाडू प्रसाद वाटप कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टी उदय वैद्य यांनी केले आहे