MH 13News Network
सोलापूर विद्यापीठातील परिसंवादात मान्यवरांचा सूर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्मक नैतिकता, लोकशाही, आधुनिक राजकारण आणि समाजकारण यातून राष्ट्रनिर्मितीचे ध्येय साध्य करता येते, असे विचार जनमाणसात रुजविले आणि त्या विचाराचे अनुकरण समाजातील प्रत्येक घटकाने केले पाहिजे, असा सूर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित सप्ताहातील राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर या परिसंवादात उमटला.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये दि. १४ ते २० एप्रिल या कालावधीत फुले-आंबेडकर सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यामध्ये ग्रंथप्रदर्शन, परिसंवाद, निबंधस्पर्धा, सलग १४ तास अभ्यास, चित्रकला स्पर्धा, भीम गीतांचा कार्यक्रम, व्याख्यान अश्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सप्ताहात ‘राष्ट्रानिर्मते डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ विषयावर परिसंवाद झाला. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर अध्यक्षस्थानी होते. शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पवार आणि सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक प्रा. डॉ. गौतम कांबळे हे परिसंवादास व्याख्याते म्हणून लाभले होते. कार्यक्रमास विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे, वित्त व लेखाधिकारी सी.ए. श्रेणिक शहा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.देवानंद चिलवंत आणि प्रा. सचिन गायकवाड यांची विशेष उपस्थिती होती.
प्रा. डॉ. गौतम कांबळे म्हणाले, अर्थशास्त्रज्ञ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठे व व्यापक योगदान दिले आहे. अर्थशास्त्रामध्ये नोबेल पारितोषिक प्राप्त अर्थशास्त्रज्ञ डॉ. अमर्त्य सेन हे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अर्थशास्त्रातील गुरू मानतात. चलन, सुवर्ण विनिमय, शेतीच्या राष्ट्रीयकरणाची संकल्पना, वित्तीय व्यवस्था, जलनीती, विद्युत विकास, शेतकरी, कामगार आणि स्त्रियांविषयक धोरण, दारिद्र निर्मुलन याविषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समजून घेताना त्यांच्यातील अर्थशास्त्रज्ञ किती महत्वाचा आणि दृष्ट होता हे लक्ष्यात येते. आर्थिक विषमता हे देशासमोरील एक मोठे आव्हान आहे आणि ते दूर करण्यासाठी देशाचा आर्थिक कणा मजबूत करण्यासाठी देशाला स्वयंभू बनविण्यासाठी देशात आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी आजही देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचारांची आवश्यकता आहे.
प्रा.डॉ. प्रकाश पवार घटनाकार, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील स्वातंत्र्य सैनिक आणि समाजसुधारणेच्या चळवळीतील समाज सुधारक या सर्वांच्या इच्छांचा सार काढुन स्वातंत्र्य, समता, बंधुता हे सुत्र कायम करुन राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेची निर्मिती केली. भारताचे नागरिक हाच राज्यघटनेचा केंद्रबिंदू आहे. घटनात्मक नैतिकता ही जबाबदार नागरिकाच्या मनात निर्माण होणारी भावना आहे. घटनात्मक नैतिकता राखणे हे केवळ न्यायपालिकेचे किंवा राज्याचेच नव्हे तर व्यक्तींचेही कर्तव्य आहे. आपल्याला कोणत्या प्रकारचा समाज स्थापन करायचा आहे, याचा राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत स्पष्ट उल्लेख आहे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक-आर्थिक समानता प्रस्थापनेचे ध्येय बाळगले होते. घटनेने माणसाला माणुस बनवण्याचे तत्व स्विकारले. त्यांच्या राष्ट्रभक्तीच्या संकल्पनेत माणूसपण विकसित करण्यास जसे महत्त्व होते, तसे संविधानिक मूल्ये व लोकशाही शिक्षणालाही प्रचंड महत्त्व आहे. सुशिक्षित तरुण देशाच्या लोकशाहीला पोषक ठरतो. देशाला घडविण्यासाठी सर्व थोर समाजसुधारकांनी मोलाचे योगदान दिले आहे. आता तरुणांची जबाबदारी आहे की, त्यांनी हा इतिहास आणि कार्य समजून घेऊन देशाला एका सर्वोच्च विकासाच्या शिखरावरती घेऊन जाण्यासाठी सक्रीय होणे. घटनेतील कलमे, घटनात्मक नैतिकता, लोकशाही, आधुनिक राजकारण आणि समाजकारण विवेक बुद्धीने समजुन घेण्याचा संकल्प युवकांनी करावा, असेही ते म्हणाले.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.राजेंद्र वडजे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी आभार मानले. डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.