MH13 news network
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर येथील पत्रकारांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साकारण्यात येत असलेल्या घरांच्या किमती कमी करून त्या सर्वसामान्य पत्रकारांना परवडतील अशा पातळीवर आणाव्यात, अशी मागणी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.देशातील पत्रकारांसाठी रहिवास योजना असलेला हा पहिलाच प्रकल्प आहे.

नागपूर येथील मुख्यमंत्री निवास ‘रामगिरी’ येथे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबतचे निवेदन दिले. यावेळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आणि राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा विठ्ठलाची मूर्ती देऊन सत्कार केला.
पत्रकारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन घरांच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी राज्य श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांच्यासह राज्यातील विविध श्रमिक पत्रकार संघांचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मागणीस सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पत्रकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोलापूर शहरात होत असलेल्या रहिवास प्रकल्पाचे अंतिम टप्प्यातील काम वेगाने सुरू असून याची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यासह, देशातील हा पत्रकारांसाठी असलेला महत्त्वपूर्ण घरांचा प्रकल्प आहे.







