MH 13 News Network
गहिवरलेल्या वातावरणात साश्रू नयनांनी सोलापूरकरांनी वाहिली माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली
सोलापूर : प्रतिनिधी
गहिवरलेल्या वातावरणात जुन्या आठवणींना उजाळा देत साश्रू नयनांनी सोलापूरकरांनी माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहिली. महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी जुना विडी घरकुल येथील संभाजीराव शिंदे प्रशालेत शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते माजी महापौर महेश कोठे यांच्या प्रतिमेस फुले अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी श्री सिद्धारूढ सांस्कृतिक भजनी मंडळ लक्ष्मण देविदास आणि सहकाऱ्यांनी भजन सादर केले.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल म्हणाले, माजी महापौर महेश कोठे आणि माझी अनेक दशकांपासूनची मैत्री होती. ते अत्यंत धाडसी व्यक्तिमत्व होते. वाघासारखा घडणारा हा नेता होता.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीतही पूर्वी बायपास सर्जरी झाल्यामुळे अधिक पदयात्रा करू नका असा आम्ही आग्रह करून देखील त्यांनी नागरिकांशी संपर्क तोडला नाही. विडी घरकुलच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे.माजी महापौर ॲड. यू. एन. बेरिया म्हणाले, सर्वसामान्यांसाठी झटणारे, अभ्यासू, विकासाचे ध्येय असणारे नेतृत्व होते. शहरात आयटी पार्क, विधी महाविद्यालयाचे स्वप्न त्यांनी पाहिले. गरिबांची मनापासून काळजी करणारे नेते अशी त्यांची ओळख होती.

शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे म्हणाले, महेश कोठे यांच्या निधनाने सोलापूर शहर कासावीस झाले. त्यांच्यावर लोकांचे प्रचंड प्रेम होते. वैचारिक मतभेद असले तरी मनभेद नव्हते. अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा परिचय सोलापूरकरांना होता. सर्वसामान्य नागरिकांच्या डोळ्यातील आसवे हीच त्यांची खरी संपत्ती होती. हजारो गोरगरीब नागरिकांच्या घरकुलाचे स्वप्न त्यांनी पाहिले.प्रा. अशोक निंबर्गी म्हणाले, महेश कोठे हे दातृत्व असलेले नेतृत्व होते. महानगरपालिकेचे अनभिषिक्त सम्राट होते.
जनतेच्या हृदयातील आमदार होते. लोखंडाला सोने करण्याची कला त्यांच्यात होती. त्यांच्या निधनाने शहर पोरके झाले आहे.काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, महेश कोठे यांनी गोरगरिबांना तळागाळातून वर आणले. विडी घरकुलसह शहराचा विकास केला. प्रचंड राजकीय ताकद, लोकांचा गोतावळा जमवला. त्यांचे अपूर्ण स्वप्न आपण पूर्ण करण्याची आवश्यकता आहे.
भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, महेश कोठे हे अभ्यासू नेतृत्व होते. त्यांना संपूर्ण शहराचा अभ्यास होता. विकासाचे ध्येय ठेवून राजकारण करणारे नेते म्हणून त्यांना ओळखले जाते. आयटी सेक्टर च्या माध्यमातून त्यांनी विकासाची दिशा दाखवली.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे म्हणाले, माजी महापौर महेश कोठे यांनी अनेक कार्यकर्ते घडवले. अनेकांना संधी दिली. माणसे पारखली. युथ काँग्रेस तसेच शिवसेनेत सोबत काम करण्याची संधी मिळाली.
छत्रपती श्री संभाजी महाराजांची मूर्ती सोलापुरात उभी करण्याचे श्रेय माजी महापौर महेश कोठे यांना जाते. ते अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार राकेश टोळे, सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते सुरेश पाटील, माजी महापौर संजय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे, पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. श्रीनिवास क्यातम, श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक सिद्धाराम चाकोते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) महेश गादेकर, माजी नगरसेवक मधुकर आठवले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, हिंदू महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे, अशोक इंदापुरे, कम्युनिस्ट पार्टीचे युसुफ मेजर, माजी नगरसेवक नागेश वल्याळ आदींनी श्रद्धांजली वाहिली. माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी माजी महापौर महेश कोठे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोलापुरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, धार्मिक, सांस्कृतिक तसेच इतर अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
अनेकांना अश्रू अनावर
श्रद्धांजली सभेत विविध क्षेत्रातील व्यक्तींकडून श्रद्धांजली वाहण्यात येत असताना अनेक महिला भगिनींसह अनेकांना अश्रू अनावर झाले होते.