मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने संगीता इलेक्ट्रिक अॅण्ड हार्डवेअर स्टोअरच्या समोर, पनवेल – मुंब्रा रस्ता, पिंपरीगाव ता. जि. ठाणे या ठिकाणी गोवा राज्यात निर्मित, विक्रीस परवानगी असलेला व राज्यात विक्रीस बंदी असलेला बनावट विदेशी मद्याचा साठा, दहाचाकी वाहन, दोन मोबाईलसह जप्त केला आहे. या कारवाईमध्ये एकूण 85 लाख 42 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ह्या ठिकाणी अवैध मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला आर. जे. 09 जी.सी 1907 क्रमांकाच्या ट्रकमधील विदेशी मद्याचे 960 बॉक्स आढळून आले. या गुन्ह्यापोटी मोहम्मद शाहीद कमरूद्दीन हुसेन (वय 24) व नासीर सोकत हुसेन (वय 26) रा. कोटला जि. मेवात (हरियाणा) यांना अटक करण्यात आली आहे. उत्पादन शुल्क विभागाने यापूर्वीदेखील परदेशातून, दिल्लीतून महाराष्ट्रात आयात केलेल्या विविध बँण्डच्या विदेशी स्कॉच मद्याच्या सीलबंद बाटल्यांची मुंबईमध्ये विक्री करणाऱ्या इसमावर गुन्हे नोंद केलेले आहेत.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक प्रसाद सुर्वे, कोकण विभागीय उप आयुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दिगंबर शेवाळे, दुय्यम निरीक्षक आर. पी. दांगट व त्यांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या कारवाईत दुय्यम निरीक्षक एस. जे जरांडे, जवान केतन वझे, हनुमंत गाढवे, संपत वनवे, नारायण जानकर, नानासाहेब शिरसाट, भाऊसाहेब कराड, विजय पाटील, सागर चौधरी यांनी सहकार्य केले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री. दांगट करीत आहेत, असे निरीक्षक श्री. शेवाळे यांनी कळविले आहे.