वटवृक्ष देवस्थान कडून रुग्ण सेवा हीच स्वामी सेवा तत्वाचे पालन.
अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित मैंदर्गी-गाणगापूर रोडवरील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात नुकतेच मोफत मासिक आरोग्य आयुर्वेदिक शिबिर संपन्न झाले. मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून या शिबिराचे शुभारंभ करण्यात आले. या शिबिरात लातूर येथील विशेष नाडीतज्ञ व पंचकर्म विशेषज्ञ एमडी आयुर्वेद डॉ.सुधीर घुगे व जनरल फॅमिली फिजिशियन आयुर्वेद तज्ञ डॉ.श्रुती घुगे यांच्या मोफत तपासणी व मार्गदर्शनाचा १३८ रुग्णांनी लाभ घेतला. या आरोग्य शिबिरात पित्त विकार, वात विकार, संधिवात, पोट विकार, त्वचा विकार, मुतखडा, स्वर्ण प्राशन इत्यादी विकारांवर
डॉ.सुधीर घुगे व डॉ.श्रुती घुगे यांनी तपासणी करून रुग्णांना मार्गदर्शन व औषधोपचार केले. जवळपास १३८ रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. याप्रसंगी बोलताना मंदिर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीने श्री स्वामी सेवेपासून प्रेरणा घेऊन रुग्णसेवाही जोपासलेली आहे. या माध्यमातूनच देवस्थाने रुग्णालयाची निर्मिती केली. या रुग्णालयात वेळोवेळी विविध प्रकारचे शिबिरे भरविली जातात. त्या पार्श्वभूमीवरच आज येथे आयुर्वेदिक आरोग्य शिबिराचे शुभारंभ झालेले आहे. दर महिन्यातून एकदा हे शिबिर असणार आहे. तरी तालुक्यातील गरजू रुग्णांनी या आरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन महेश इंगळे यांनी याप्रसंगी केले. सदरहू आरोग्य शिबिर यशस्वी होण्यासाठी युवा नेतृत्व प्रथमेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, रवी मलवे, चंद्रकांत सोनटक्के, सुनील पवार, विद्याधर गुरव, भीमा मिनगले, मनोज इंगुले, बाळासाहेब एकबोटे आदींनी परिश्रम घेतले.