MH 13 NEWS NETWORK
मुंबई, मुंबई शहर जिल्ह्यातील ‘३०-मुंबई दक्षिण मध्य’ व ’३१- मुंबई दक्षिण’ या दोन्ही लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात केलेल्या तयारीचा केंद्रीय निवडणूक निरीक्षक (पोलीस) मुकेश सिंह यांनी आज आढावा घेतला.
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीला मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव, ’३१-मुंबई दक्षिण’ चे निवडणूक निर्णय अधिकारी रवि कटकधोंड, मुंबई शहर दक्षिण विभाग अपर पोलिस आयुक्त डॉ. अभिनव देशमुख, मुंबई शहर मध्यचे अपर पोलिस आयुक्त अनिल पारसकर, पोलिस उपायुक्त डॉ. मोहित गर्ग, डॉ. प्रवीण मुंडे, अकबर पठाण, आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी उन्मेष महाजन, कायदा व सुव्यवस्था समन्वय अधिकारी तेजूसिंग पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्यामसुंदर सुरवसे, ‘स्वीप’च्या प्रमुख समन्वय अधिकारी फरोग मुकादम, समन्वय अधिकारी (खर्च) राजू रामनानी, तक्रारी व्यवस्थापन निवारण आणि मतदार हेल्पलाईनचे समन्वय अधिकारी राजू थोटे, माध्यम कक्षाच्या समन्वय अधिकारी काशीबाई थोरात आदी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे मतदान केंद्रांवरील पोलीस बंदोबस्त, फ्लाईंग स्कॉड, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम, व्हिडिओ सर्व्हिलन्स टीम यांनी आतापर्यंत केलेल्या कामांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी निर्भय, मुक्त व निष्पक्ष वातावरणात निवडणुका होण्यासाठी पोलिसांची भूमिका महत्त्वाची असल्याचे श्री. सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, ’३१-मुंबई दक्षिण’ लोकसभा मतदार संघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) राजीव रंजन, ’३०-मुंबई दक्षिण मध्य’चे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) गौरी शंकर प्रियदर्शी यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयास भेट देऊन आज निवडणुकीच्या कामकाजाचा आढावा घेतला.
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम कक्षाची केंद्रीय निवडणूक निरीक्षकांकडून पाहणी
मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रणासाठी स्थापित प्रसारमाध्यम कक्ष व आदर्श आचारसंहिता तक्रार निवारण नियंत्रण कक्षास केंद्रीय निवडणूक निरीक्षक (पोलिस) मुकेश सिंह, केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) राजीव रंजन, गौरी शंकर प्रियदर्शी यांनी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी तिन्ही केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी प्रसारमाध्यम कक्ष व आदर्श आचारसंहिता तक्रार निवारण नियंत्रण कक्षाच्या कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली. यावेळी श्री. यादव यांनी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रसारमाध्यम कक्षाद्वारे मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमांतील पेड न्यूज, समाजमाध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवले जात असून उमेदवारांच्या जाहिरातीचे पूर्व प्रमाणीकरण केले जात असल्याचे सांगितले. तसेच सी-व्हिजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींबाबतही तातडीने कार्यवाही करण्यात येत असल्याचे सांगितले.
केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी उमेदवारांच्या वर्तमानपत्रातील, इलेक्ट्रॉनिक व विशेषत: समाजमाध्यमांमधील जाहिरातींवर कटाक्षाने लक्ष ठेवावे तसेच सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा तातडीने करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केली.
००००