महेश हणमे /9890440480
सकल मराठा समाजाने माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघांत सर्वांच्या सहमतीने एक उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी माळशिरसमध्ये उद्या गुरुवारी समाज बांधवांच्या जाहीर बैठकीचे आयोजन केल्याची माहिती समन्वयक माउली पवार यांनी मंगळवारी दिली.
मनोज जरांगे पाटील यांनी 24 मार्च रोजी महाबैठकीतून लोकसभा निवडणुकी संदर्भात भूमिका ठरवण्याचे आवाहन केले होते.या पार्श्वभूमीवर मराठा समाजात बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीतील अहवाल मनोज जरांगे पाटील यांना 29 मार्च 2024 रोजी सादर करण्यात येणार आहे. अंतरवाली सराटी या ठिकाणी घेण्यात आलेल्या महाबैठकीचे रूपांतर जाहीर सभेत झाले होते त्यास मराठा समाज बांधवांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.
लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनातील कार्यकर्त्यांची भूमिका ठरविण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी २४ मार्च रोजी अंतरवाली सराटी येथे महाबैठकीचे आयोजन केले होते. राज्यातील प्रत्येक मतदारसंघात समाज बांधवांच्या सहमतीने एकच उमेदवार द्यावा. या उमेदवाराला मराठा समाजाने पाठिंबा द्यावा. दुसऱ्या कोणत्याच पक्षातील कार्यक्रमाला अथवा सभेला आरक्षण आंदोलनातील मराठ्यांनी जाऊ नये असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले होते.
सर्वांच्या सहमतीने एकच उमेदवार देऊन त्याला निवडून आणण्यासाठी आरक्षण आंदोलनातील नेत्यांनी काम करावे, असा निर्णय या बैठकीत झाला होता. त्यानुसार सोलापूर व माढ्यात एकच उमेदवार देण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार यांनी दिली.
माढा हा देश पातळीवरील चर्चेतील मतदारसंघ आहे. या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी एक साखर कारखानदार, एक उद्योजक, एक शिक्षण सम्राट, एक डॉक्टर संपर्कात आहेत.
दरम्यान,सोलापूर लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी एक माजी आमदार, भाजपातील एक माजी पदाधिकारी,एक सनदी अधिकारी, एका माजी नगरसेविकेसह अनेकजण इच्छुक आहेत. सोलापूरची बैठक शुक्रवारी होईल. मराठा समाजाला ओबीसी प्रवगातून ५० टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावे, ही समाजाची मागणी आहे. या मागणीला पाठिंबा देणाऱ्या उमेदवाराला आम्ही सर्व संमतीने उमेदवारी देण्याचा निर्णय घेऊ, असेही माऊली पवार यांनी सांगितले.
माढा लोकसभा मतदार संघातील फलटण, माण ,माळशिरस, सांगोला ,करमाळा ,माढा या सर्व तालुक्यातील व या लोकसभा मतदार संघांत येणाऱ्या सर्व गावातील सकल मराठा समाज बांधवांसह सर्व बहुजन समाज बांधवांची गुरुवार दिनांक 28 मार्च 2023 रोजी दुपारी 2.00 वा अक्षता मंगल कार्यालय माळशिरस,माळशिरस- अकलूज रोड या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.