MH 13News Network
प्रकाश आंबेडकर यांनी काल मंगळवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांची तातडीने भेट घेतली आहे.दोघांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीवर एक तास चर्चा झाली. वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडी सोबत चर्चा जवळपास संपुष्टात आली आहे. जागा वाटपावरून एकमत होत नसल्याने मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतच्या भेटीला वेगळे महत्त्व आले आहे. यातून नवं फॅक्टर निर्माण होणार का.? याची चर्चा सुरू झाली आहे
मनोज जरांगे पाटील यांनी गावांमध्ये बैठका घेऊन, निवडणूक लढवावी का? मतदार संघातून एकच अपक्ष उमेदवार द्यावा का? याबद्दल समाजाकडून अहवाल मागविला आहे. तो अहवाल पाहून ३० तारखेला जरांगे पाटील पुढील निर्णय घेणार आहेत.
वेळोवेळी आपल्या भाषणांमधून प्रकाश आंबेडकर यांच्या विषयी मनोज जरांगे पाटील यांनी सकारात्मकता आणि आदर दर्शवला होता. तसेच प्रकाश आंबेडकर यांनी वेगवेगळ्या प्रसंगी मराठा आरक्षणासंदर्भात, जरांगे पाटील घेत असलेल्या भूमिकेबद्दल आपली मते व्यक्त केली होती. दोघे आपापल्या समाजातील प्रमुख घटक असून त्यांच्या भूमिकेमुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ माजू शकते.
आज बुधवारी प्रकाश आंबेडकर आपली राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. वंचित समाजातील मते ही लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. यामुळे आंबेडकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने वेगळी भूमिका घेतली असून एकास एक उमेदवार देण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी राखीव मतदार संघ असेल त्या ठिकाणी चळवळीतील आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या कोणत्याही जातीच्या व्यक्तीला उभे करण्याची भूमिका घेतली आहे.
राखीव मतदारसंघातील समाजाने उभे केलेल्या कार्यकर्त्याला मतदानाच्या माध्यमातून पाठबळ देण्याचे काम मराठा समाज करणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
दरम्यान, मराठा आणि वंचित समाज जर एकत्र आले तर महाराष्ट्रात नवीन राजकीय अध्याय सुरू होईल.अशी मोठी चर्चा मराठा समाज आणि वंचित घटकांमध्ये सुरू झाली आहे.