सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिलदार आणि सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, दक्षिण सोलापूर मतदारासंघातील क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी यांच्यासाठी मतदान घेण्याबाबतचे प्रशिक्षण संपन्न
MH 13News Network
जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिलदार, क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदान केंद्रावरती मतदान घेण्यासंबंधी दिलेले आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवन येथे सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसिलदार, क्षेत्रीय अधिकारी यांच्याकरिता निवडणूक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्यासह सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसिलदार उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, मतदानाचे संपूर्ण कामकाज इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे होणार आहे. या निवडणूकमध्ये एम-३, कंट्रोल युनिट, बॅलट युनिट व व्हीव्हीपॅट मशीनचा वापर आहे. यासाठी विहित नियम व मतदान केंद्रातील मतदान प्रक्रियेसंबधी प्रत्येक टप्पा काळजीपूर्वक वाचा तसेच भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा.
उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी संतोष देशमुख यांनी पीपीटी द्वारे मतदान केंद्राची तयारी, मॉक पोल घेणे, प्रत्यक्ष मतदानासाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट तयार करणे, सर्व मशीन्स सीलबंद करणे, मतदान प्रक्रियेसंबधी विविध प्रपत्रे भरणे, मतदान यंत्रे, मतदान साहित्य व सीलबंद पाकिटे जमा करणे याविषयी सविस्तर माहिती दिली. तसेच मतदान पथकाची जबाबदारी, मतदान प्रक्रियेतील महत्वाचे टप्पे, मतदानापूर्वी मतदान दरम्यान आणि मतदान संपल्यावर येणाऱ्या विविध व वैशिष्ठ्यपूर्ण प्रसंगी करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर माहिती त्यांनी दिली.
मतदान केंद्राध्य्क्षासाठी काय करावे आणि काय करू नये, हॅंडबुक २०२३, चेकलिस्ट २०२३, आणि ईव्हीएम व व्हीव्हीपॅट २०२३ मध्ये देण्यात आलेल्या माहितीपुस्तीकेचे वाचन करावे. दिव्यांग मतदारासाठी मतदान केंद्रावर तयार करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी करावी. मतदान केंद्रावर व त्याच्या सभोवताली निवडणूक कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी असेही श्री. देशमुख यांनी सांगितले.