नांदेड – १६- नांदेड लोकसभा मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार वसंतराव बळवंतराव चव्हाण विजयी झाले आहेत.वसंतराव बळवंतराव चव्हाण यांना एकूण ५ लक्ष २८ हजार८९४ मते मिळाली. त्यांनी भाजपचे उमेदवार प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांचा ५९ हजार ४४२ मतांनी पराभव केला.
४ जूनला सकाळी ८ वाजता मतमोजणीला शांततेत सुरुवात झाली. दुसऱ्या फेरीपासून आघाडीवर राहत वसंतराव चव्हाण यांनी शेवटपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्यांना २७ व्या फेरीनंतर त्यांना विजयी घोषित करुन प्रमाणपत्र बहाल केले.
तत्पूर्वी आज सकाळी ७.३० च्या सुमारास निवडणूक निरीक्षक शंशाक मिश्र आणि समीरकुमार ओ. जे. व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी विविध पक्षाच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत स्ट्राँगरुम उघडण्याची कार्यवाही केली. ८ वाजता स्ट्राँगरुम उघडून मतमोजणीला सुरुवात केली. सर्वप्रथम पोस्टल मत मोजणीला सुरुवात झाली. या सुमारास ईव्हीएम मशीन वरील मतमोजणीला ही सुरुवात झाली. शासकीय तंत्रनिकेतनच्या तळमजल्यावर तीन विधानसभा मतदारसंघ तर पहिल्या माळ्यावर तीन मतदार संघ अशा पद्धतीने सहा विधानसभा क्षेत्रात ही मतमोजणी पार पडली.
सकाळी साडेदहाच्या सुमारास पहिला फेरीचा निकाल आला.पहिल्या मतमोजणी फेरीत भाजपाचे उमेदवार प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांनी १९ हजार ५४३ मते घेऊन १ हजार 386 मतांची आघाडी घेऊन पुढे होते. तर दुसऱ्या फेरीपासून काँग्रेसचे वसंतराव बळवंतराव चव्हाण यांनी आघाडीवर कायम ठेवत शेवटच्या फेरीला ५९ हजार ४४२ मतांनी विजयी झाले.
सकाळी आठ वाजता पासून सुरू झालेल्या मतमोजणीला रात्री वाजता २७ व्या फेरीच्या नंतर विराम मिळाला. नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये सहा विधानसभा क्षेत्र येतात. मतमोजणीसाठी विविध विभागाचे पाचशे कर्मचारी तर पोलीस विभागाचे 500 कर्मचारी असे जवळपास 1000 कर्मचारी मतमोजणीच्या कार्यात कार्यरत होते. नांदेड जिल्हा प्रशासनाने यावेळी मतदान प्रतिनिधी माध्यम प्रतिनिधी व मतमोजणी कर्मचाऱ्यांसाठी आद्ययावत व्यवस्था केली होती. त्यामुळे प्रचंड उन्हाचा दिवस असतानाही अतिशय गतीने विना अडथळा मतमोजणी प्रक्रिया पार पडली. मतमोजणी केंद्राच्या बाहेर विस्तृत माध्यम केंद्र उभारण्यात आले होते. जिल्ह्यातील शंभरावर माध्यम प्रतिनिधी वृत्त संकलनासाठी या माध्यम केंद्रात गर्दी करून होते. नांदेड सह देशभरातील निवडणुकीचे निकाल विशाल एलईडी स्क्रीनवर पाहण्याची व्यवस्था या ठिकाणी प्रशासनाने केली होती.
११.२८ लक्ष मतांची मोजणी
नांदेड लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडले. नांदेड जिल्हयात एकूण 18 लाख 51 हजार 843 मतदार होते. यात 9 लाख 55 हजार 84 पुरुष तर 8 लाख 96 हजार 617 महिला तर 142 तृतीयपंथीयाचा समावेश होता. जिल्हयामध्ये ६०.९४ टक्के मतदान झाले एकूण ११ लक्ष २८ हजार ५६४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. आज या सर्व मतांची मोजणी करण्यात आली.
5315 टपाली मते
या निवडणुकीमध्ये 5315 टपाली मते मोजण्यात आली. यामध्ये निवडणुकीसाठी कार्यरत असणारे कर्मचारी, सैन्य दलात असणारे कर्मचारी, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. आज झालेल्या मतमोजणी मध्ये विजयी उमेदवार वसंतराव चव्हाण यांना 2029 तर भाजपचे उमेदवार प्रतापराव चिखलीकर यांना २ हजार तर लढतीत तिसऱ्या क्रमांकावर न आलेले वंचित बहुजन आघाडीचे भोसीकर यांना 422 टपाली मते मिळाली.
२७ फेऱ्यांमध्ये मतमोजणी
नांदेड जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील मतदान केंद्राच्या संख्येवरून प्रत्येक विधानसभा क्षेत्राच्या फेऱ्या ठरतात. जिल्हामध्ये नांदेड दक्षिण सर्वात मतदान केंद्र असणारा मतदारसंघ असल्याने या ठिकाणी 23 फेऱ्या झाल्या नायगाव व देगलूर मतदारसंघासाठी 25 फेऱ्या झाल्या तर भोकर व मुखेड मतदार संघासाठी 26 फेऱ्या झाल्या तर नांदेड उत्तर मसदार संघासाठी 27 फेऱ्या घेण्यात आल्या.२७ फेऱ्यानंतर अंतिम निकाल घोषित करण्यात आला.
23 उमेदवारांची अंतिम आकडेवारी
यामध्ये चव्हाण वसंतराव बळवंतराव (इंडियन नॅशनल काँग्रेस)- 528894 , चिखलीकर प्रतापराव गोविंदराव (भारतीय जनता पार्टी)-469452, पांडुरंग रामा अडगुळवार (बहुजन समाज पार्टी) -6901, अब्दुल रईस अहेमद (देश जनहीत पार्टी) -1510, अविनाश विश्वनाथ भोसीकर (वंचित बहुजन आघाडी) – 92512, कौसर सुलताना (इंडियन नॅशनल लीग) -1215, राहुल सुर्यकांत एंगडे (बहुजन मुक्ती पार्टी) -737, रुक्मिणीबाई शंकरराव गीते (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष) -903, सुशीला निळकंठराव पवार (समनक जनता पार्टी) -1890, हरी पिराजी बोयाळे (बहुजन भारत पार्टी) -878, तर अपक्षामध्ये कदम सुरज देवेंद्र (अपक्ष) -799, कल्पना संजय गायकवाड (अपक्ष) -1310, गजानन दत्तरामजी धुमाळ (अपक्ष) -950, जगदीश लक्ष्मण पोतरे (अपक्ष) -963, देविदास गोविंदराव इंगळे (अपक्ष) -1471, नागेश संभाजी गायकवाड (अपक्ष) -3318, निखिल लक्ष्मणराव गर्जे (अपक्ष) -4325, भास्कर चंपतराव डोईफोडे (अपक्ष) -2080, महारुद्र केशव पोपळाईतकर (अपक्ष) -913, राठोड सुरेश गोपीनाथ (अपक्ष) -808, लक्ष्मण नागोराव पाटील (अपक्ष) -923, साहेबराव भिवा गजभारे (अपक्ष) -1193, ज्ञानेश्वर रावसाहेब कपाटे (अपक्ष) -681 तर नोटा मिळालेली मते 3628 अशी अंतिम आकडेवारी आहे.
१६ तासांची अखंड धडपड
आज निवडणूक निरीक्षक शशांक मिश्न, समीरकुमार ओ. जे. यांच्यासह जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात विविध विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सकाळी ६ वाजतापासून निवडणूक कार्यात झोकून दिले होते. गेल्या 80 दिवसांपासून कर्मचारी या कार्यात कार्यरत असून मतमोजणीने निवडणूक कार्याला पूर्ण केल्याचे समाधान कर्मचाऱ्यांकडे होते.