सोलापूर, दि. १४ जुलै (प्रतिनिधी):
सोलापुरात एका महिलेसोबत कथित लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणात शहराचे माजी महापौर मनोहर सपाटे (वय – ७२) यांच्यावर BNS कलम 74, 75, 78 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नसल्याने मराठा समाज आक्रमक झाला असून, “अटक करा अन्यथा चक्री उपोषण” असा इशारा देण्यात आला आहे.
22 हून अधिक गुन्ह्यांचा आरोप – राजकीय संरक्षण मिळाल्याचा दावा

सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने सोलापूर पोलीस आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये सपाटे यांच्यावर यापूर्वीच २२ पेक्षा अधिक गुन्हे दाखल असून, ते “राजकीय संरक्षण प्राप्त असलेले गुंड आणि लैंगिक विकृती असलेले आरोपी” असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
पोलीस प्रशासनाने त्यांच्या विरोधात स्थानबद्धतेची (Preventive Detention) कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
“रुग्णालयात नाटक; अटक टाळण्याचा प्रयत्न”
सपाटे यांनी अटक टाळण्यासाठी आजाराचे नाटक करून गुन्हा दाखल असलेल्या पोलीस ठाण्याच्या समोरच असलेल्या खासगी रुग्णालयात स्वतःला दाखल केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला.
त्यामुळे सपाटे यांना तातडीने अटक करून न्यायालयीन प्रक्रिया पारदर्शक ठेवावी, अशी मागणी समाज बांधवांनी केली आहे.
निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांना…
या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच पोलीस महासंचालक यांनाही देण्यात आली असून, जर योग्य ती कारवाई झाली नाही, तर संविधानिक मार्गाने चक्री उपोषण करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
पीडितेला पैशाचं आमिष? – अॅड. योगेश पवार यांचा खळबळजनक आरोप
मुंबई येथून पीडितेला कायदेशीर सहाय्य करणारे अॅड. योगेश पवार यांनी मनोहर सपाटे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, “सपाटे आणि ज्ञानेश्वर सपाटे यांनी पीडित महिलेला पैशाचं आमिष दाखवून गप्प बसवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
“पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पीडित महिलेने स्वतः त्यांना कॉल करून ही माहिती दिली असून, या संवादाचं कॉल रेकॉर्डिंगही उपलब्ध आहे, असा दावाही त्यांनी केला.
जामीन अर्जावर पुढील सुनावणी १६ जुलै रोजी..
आज (१४ जुलै) सोलापुरातील न्यायालयात सपाटे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती, मात्र न्यायालयाने पुढील तारीख १६ जुलै २०२५ दिली आहे.—
ही घटना सोलापुरातील समाजकारणात आणि राजकारणात मोठी खळबळ उडवणारी ठरली असून, मराठा समाजाचा आक्रमक पवित्रा पाहता आगामी काही दिवसांत आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे.