MH 13News Network
सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील लहूळ या गावातील लोकरे कुटुंब हे गरजवंत मराठ्यांचे कुटुंब ठरले असून एकाच परिवारातील 86 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती विलास लोकरे यांनी दिली आहे.
बुधवारी सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार, राजन जाधव, प्रा.गणेश देशमुख यांच्या हस्ते कुटुंबातील सर्व जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. लऊळ गावातील लोकरे कुटुंबाच्या स्वगृही हा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी लाभार्थी कुटुंबामध्ये मोठा आनंद साजरा करण्यात आला.
आहेर देऊन केला सत्कार
दरम्यान, लोकरे कुटुंबातील नंदकुमार वामन लोकरे यांनी
सातत्याने पाठपुरावा करून हे सर्व कुणबी प्रमाणपत्र काढले. यासाठी शासन स्तरावर दररोजचा पाठपुरावा नंदकुमार यांनी केलेला होता. या बद्दल त्यांचा सपत्नीक संपूर्ण आहेर देऊन सकल मराठा समाजाच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित लोकरे कुटुंब आणि नातेवाईकांनी घोषणा देऊन आनंद व्यक्त केला. सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार, राजन जाधव, प्रा. गणेश देशमुख, राजू सुपाते यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
प्रत्येक वाडी वस्तीवर आनंद सोहळे साजरे व्हावेत..
लोकरे कुटुंबाची 1859 ची कुणबी नोंद सापडली आहे त्यामुळे संपूर्ण परिवाराला कुणबी प्रमाणपत्र मिळाले. लोकरे कुटुंब याचा आनंद साजरा करत आहे. परंतु मराठा समाजाने यावर न थांबता प्रत्येक वाड्यावर असे आनंद सोहळे साजरे झाले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न करावेत.
माऊली पवार , अध्यक्ष
सकल मराठा समाज
ज्याप्रमाणे लोकरे कुटुंबाने पाठपुरावा करून कुणबी दाखले काढले त्याप्रमाणे सर्व मराठा समाजाने सातत्याने प्रयत्न करून पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
राजन जाधव,नेते
सकल मराठा समाज
शहरात लवकरच कार्यशाळेचे आयोजन..
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे हे यश मिळाले असून केवळ जल्लोष न करता शासन दरबारी पाठपुरावा करून कुणबी प्रमाणपत्र मिळवावे. यासाठी सोलापुरात लवकरच कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे
प्रा.गणेश देशमुख,नेते
सकल मराठा समाज
माझ्या पूर्वजांच्या एका नोंदीवरून 86 जनाचे कुणबी दाखले मिळाले आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे आलेले हे यश आहे. हे दाखले या आंदोलनातील सक्रिय असणारे सकल मराठा समाजाच्या नेत्यांच्या हस्ते आमच्या कुटुंबांनी स्वीकारले. गावातील तसेच इतरांनाही कुणबी प्रमाणपत्रासाठी मदत लागल्यास एक समाज बांधव म्हणून नक्कीच मदत करू.
विलास लोकरे,लाभार्थी