उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई
mh 13 news network
मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे प्रशासनाने पाणी साचणे, पुराचे पाणी, नाले तुंबणे आदी ठिकाणे शोधून तेथे उपाययोजना कराव्यात. तसेच महानगरपालिका, नगरपालिका यांनी पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपाची व्यवस्था करावी, असे निर्देश उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आज दिले.
मंत्री महोदयांच्या शासकीय निवासस्थानी ठाणे जिल्हा मान्सुनपूर्व आढावा बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. बैठकीस दुरदृश्य संवाद प्रणालीद्वारे ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी माहिती दिली. तसेच अन्य प्रशासकीय विभागांचे विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
नाल्यांची साफ-सफाई करण्यात आली आहे. मात्र मोठा पाऊस झाल्यास नाल्यांमध्ये कचरा अडकून पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होवू शकते. या पाण्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होवून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते. नाल्यांच्या स्वच्छतेकडे नियमित लक्ष ठेवावे. धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे तात्पुरते स्थलांतर करण्याची आवश्यकता भासल्यास तात्पुरती निवारा केंद्र सुविधांनी सज्ज असावी. या ठिकाणी पिण्याचे पाणी, वीजेची सुविधा असावी, अशा सूचनाही मंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.
मंत्री श्री. देसाई पुढे म्हणाले, नागरी व ग्रामीण भागातील रूग्णालयांमध्ये औषधसाठा पुरेसा उपलब्ध करून ठेवावा. साथरोग नियंत्रणासाठी आरोग्य विभागाने सतर्क रहावे. साथरोगावरील औषधांची उपलब्धता निश्चित करावी. गृह विभागाने प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘इमरजन्सी हेल्पलाईन क्रमांक’ची सुविधा सुरू करावी. पूर किंवा पावसाशी निगडीत घटनेशी संबंधित दूरध्वनी किंवा सूचना आल्यास, तात्काळ संबंधित यंत्रणेला माहिती देवून गरजू नागरिकांना मदत द्यावी. बैठकीस दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.