पत्नीने केलेल्या ॲट्रॉसिटीच्या खटल्यातील ‘त्या’ नवऱ्याची जामिनावर मुक्तता
प्रेमविवाह केलेल्या दलित समाजातील बायकोने सवर्ण नवऱ्याविरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्याखाली दाखल केलेल्या फिर्यादीनुसर पंढरपूर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे महाराष्ट्रात खळबळ माजली होती. दरम्यान, अटकेत असलेल्या ‘त्या’ नवऱ्याला सत्र न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे.
पीडित पत्नीने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत असे कथन केले होते की, ती दलित समाजाची आहे आणि तिचा पती सवर्ण समाजाचा आहे. त्यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांना दोन मुली झाल्या आहेत. परंतु नवरा जातीवरून मला अपमानास्पद बोलतो, शारीरिक व मानसिक त्रास देतो आणि माझ्यावर लैंगिक अत्याचार करतो. त्यानुसार पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह (ॲट्रॉसिटी ॲक्ट) भारतीय दंड संहिता कलमांन्वये गुन्हा दाखल झाला होता. त्याला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपी नवऱ्याने ज्येष्ठ फौजदारी वकील धनंजय माने यांच्यामार्फत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपीचा फिर्यादीबरोबर प्रेमविवाह झाला आहे, आरोपीने पत्नीला तिच्या जातीसह स्वीकारलेले आहे. त्यामुळे आरोपीने तिचा जातीवरून अपमान करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. यावरून तो अस्पृश्यता पाळतच नाही, हे सिद्ध होते, त्यामुळे ॲट्रॉसिटी ॲक्टमधील ३(१) व ३(२) हे कलम लागूच शकत नाही. त्याचप्रमाणे अत्याचाराबाबत कोणताही ठोस आरोप नाही. विलंबाने दिलेल्या फिर्यादीवर विश्वास ठेवणेही धोक्याचे आहे, असा युक्तिवाद ॲड. धनंजय माने यांनी जामीन अर्जावरील सुनावणीप्रसंगी केला. न्यायाधीशांनी आरोपीची जामिनावर मुक्तता करताना त्याला पोलीस ठाण्यात हजेरी देण्याचे बंधन घातले आहे.
या प्रकरणात आरोपीतर्फे ॲड. धनंजय माने , ॲड. जयदीप माने, ॲड. सिद्धेश्वर खंडागळे, ॲड. सुहास कदम, ॲड. वैभव सुतार यांनी काम पाहिले.