MH 13 MEWS NETWORK
गेल्या महिन्याभरात २ कोटी ४१ लाखाचा मुद्देमाल जप्त
धुळे, : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. 02-धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे, 2024 रोजी मतदान तर 4 जून, 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. धुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित केल्यानंतर जिल्ह्यात 16 मार्च पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आचार संहिता लागू झाल्यापासून पहिल्या तीन दिवसात जिल्ह्यात 11 हजार 29 रंगविलेल्या भिंती, 5 हजार 499 पोस्टर्स, 3 हजार 646 होर्डिंग्ज, 5 हजार 57 बॅनर, 17 हजार 595 झेंडे असे एकूण 42 हजार 826 रंगविलेल्या भिंतीवरील तसेच पोस्टर्स, होर्डिग्ज, बॅनर व झेंडे काढून टाकण्यात आले आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. प्रत्येक मतदार संघात फिरते व बैठे पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. आचारसंहिता कक्षात 1950 हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असून त्यावर आतापर्यंत 278 कॉल आले असून बहुतांश तक्रारी या ईपीक कार्ड, मतदार यादीत नावाबाबत विचारणा करणाऱ्या असून त्यांचे निराकरण करण्यात आले आहे. नॅशनल ग्रेव्हीलन्स वर 178 तक्रारी आल्या असून 173 तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारींचा निपटारा करण्याचे काम सुरु आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांनी सी-व्हिजल ॲपवर तक्रार करु शकतात. आचारसंहिता लागू झाल्यापासून या ॲपवर 21 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यांचे पुढील 100 मिनिटात निराकरण करण्यात आले आहे. यावर्षी 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग बांधवाना होम व्होटिंगची सुविधा उपलब्ध करुन दिली असून अशा नागरिकांकडून 12 डी फॉर्म भरुन घेण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे प्रत्येक मतदारसंघ निहाय तसेच जिल्हास्तरावर उमेदवारांना विविध परवानगी देण्यासाठी एक खिडकी कक्ष (सुविधा कक्ष) ची स्थापना केली आहे. जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी 75 टक्केपेक्षा जास्त करण्यासाठी मतदार जनजागृतीचे काम मोठया प्रमाणात जिल्हाभरात सुरु आहे. स्वीप उपक्रमांतर्गत 8 एप्रिल, 2024 रोजी प्रत्येक गावात जनजागृती अभियान महारॅलीच्या माध्यमातून मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यात जवळपास 5 लाख नागरिकांनी सहभाग नोंदविला आहे. या दिवशी विविध रॅली, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पथनाटय असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले होते. मतदारयादी अपडेशनचे काम संपले असून मतदार व्होटर स्लिपचे काम सुरु होणार आहे. लोकसभा निवडणूकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम (मतदार यंत्र) पहिले सरमिसळचे काम पुर्ण झाले असून प्रत्येक मतदारसंघात ईव्हीएम मशिन देण्यात आले असून ते सुरक्षित ठेवण्यात आले आहे. यावर्षी प्रत्येक मतदारांला व्होटर माहिती स्लिप बीएलओ प्रत्येक घरात देण्यात येणार असून त्या स्लीपवर मतदाराची पुर्ण माहिती असणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक मतदाराला व्होटर माहितीपत्रकही देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.