अतिदुर्गम भागात गृह मतदानाच्या सुविधेने मोठा दिलासा; निवडणूक यंत्रणा पोहोचली अतिदुर्गम भागात
नागपूर : कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा कसोशीने प्रयत्न करीत आहे. रामटेक, काटोल या उपविभागातील अतिदुर्गम भागात असलेल्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात आपलेही योगदान दिले.
सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने जिल्ह्यात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या मार्गदर्शनात १४ ते १७ एप्रिल या कालावधीत गृह मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. याची सुरुवात १४ एप्रिल रोजी नागपूर पूर्व विधानसभा मतदारसंघातून करण्यात आली. त्यांनतर जिल्ह्यात विविध ठिकाणी गृह मतदान सुरू आहे.
रामटेक तालुक्यातील मध्यप्रदेश सीमेलगतच्या अति दुर्गम आदिवासी भागात वयोवृद्धांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. करवाही, दुलारा, बेलदा या गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या गृह मतदानाचा आनंद चेह-यावर पहायला मिळाला. यात दुलारा येथील जानोती उईके, शेवंताबाई मराठे करवाही येथील मंगोलाबाई उईके आणि बेलदा येथील नारायणराव भाल, गंगुबाई भाल, लक्ष्मण गराट यांनी गृह मतदान केले.
रामटेक विधानसभा मतदारसंघासाठी ज्येष्ठ तसेच दिव्यांग अशा एकूण 118 पैकी 112 मतदारांनी मतदान केले. यासाठी 13 पथके तयार करण्यात आली होती. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी मतदानस्थळी भेट देऊन पाहणी करीत मतदानाची गोपनीयता पाळण्याच्या सूचना केल्या. काटोल उपविभागातील प्रामुख्याने सोनोली, राजनी, खामली, खारगड, हिवरमठ, येनिकोनी, अंबोला, खैरगाव,गोधनी, गायमुख या गावातील वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. काटोलचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिवराज पडोळे यांनीही अनेक मतदारस्थळी भेट देत पाहणी केली.