MH 13 NEWS NETWORK
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघात सोमवारी २० मे रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी जिल्ह्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांची मतदान केंद्रावर ने-आण करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे मोफत वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय मोफत प्रवासासाठी दिव्यांग समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक मतदारांनी या सेवेचा लाभ घेवून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले आहे.
भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदार तसेच ८५+ वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या सोयीसुविधांबाबत मार्गदर्शक सूचना निर्गमित केलेल्या आहेत. यामध्ये दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिक यांना मतदान केंद्रावर सोयी-सुविधा पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही बाब विचारात घेवून मुंबई शहर जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत मतदानाच्या दिवशीचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले असून दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना आपल्या मतदान केंद्रापर्यंत पोहचविण्यासाठी मतदारसंघनिहाय समन्वय अधिकारी, दिव्यांग मतदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये दिव्यांग मतदारांकरिता एक दिव्यांग समन्वय अधिकारी याप्रमाणे दहा दिव्यांग समन्वय अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. बेस्ट बस सेवा यांच्याकडून ज्येष्ठ नागरिक मतदार व दिव्यांग मतदार यांना मतदान केंद्रावर ने-आण करण्याकरिता १० लो फ्लोर बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मतदारसंघनिहाय नेमलेल्या दिव्यांग समन्वय अधिकारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक संपर्कासाठी देण्यात आलेले आहेत.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्रांनुसार बेस्ट बस सेवेच्या अधिकाऱ्यांनी रूट मॅप करून दिलेला आहे व त्यानुसार बस थांबे ठरवण्यात आलेले आहेत. या बस थांब्यावरून दिव्यांग व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक मतदारांना या बस सेवेचा लाभ घेता येईल. तसेच लोको मोटर दिव्यांगांकरिता ५ व्हीलचेअरयुक्त लो फ्लोर बसेस व त्यासोबत एक सहाय्यक उपलब्ध करून देण्यात येत आहे.
दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मदत करण्याकरिता एकूण १३ दिव्यांग मित्र नियुक्त केलेले आहेत. ज्या ठिकाणी म्हणजे अरुंद रस्त्यामध्ये बसेस जाणार नाही, अशा ठिकाणी प्रत्येक मतदारसंघनिहाय एक टॅक्सी म्हणजेच एकूण दहा टॅक्सी उपलब्ध करून देण्यात येत आहे. याप्रमाणे दिव्यांग मतदार व ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याकरिता नियोजन करण्यात आलेले आहे.
दिव्यांग मतदारांना व्हीलचेअर बसेस सुविधेसाठी विधानसभा मतदारसंघनिहाय समन्वय अधिकारी यांचे नाव व भ्रमणध्वनी क्रमांक खालीलप्रमाणे.
- ️ १७८-धारावी/नामदेव साबळे/९७०२८३२००९
- ️ १७९-सायन कोळीवाडा/विजय साळुंखे/८३६९५३२१३८
- ️ १८०-वडाळा/तृप्ती धोंडे/९८९२१५४३०७
- ️ १८१-माहीम/रोशन पिंपळे/८९८३०४१२३६
- ️ १८२- वरळी/ज्ञानेश्वर पाटील/९४२२२००१७६
- ️ १८३-शिवडी/रवींद्र वाडीले/९४२११६९७७६
- ️ १८४-भायखळा/सुषमा गुप्ता/९८६९६२८९००
- ️ १८५-मलबार हिल/स्वाती जिरंगे/९८६९०२४२५४
- ️ १८६-मुंबादेवी/मनोज नेमाने/९८६९६०२८८५
- ️ १८७-कुलाबा/दत्तात्रय कांबळे/९१३७५१३८३२