MH 13News Network
मशिदीच्या विश्वस्तांचा वाद आपापसात मिटविण्यासाठी शहर काझींनी मशिदीत बोलावलेल्या बैठकीत आरोप-प्रत्यारोप होऊन त्यातून पाचजणांवर प्राणघातक हल्ला करून खून करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल प्रत्येकी सात वर्षे सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा झालेल्या १७ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने अपिलात जामीन मंजूर केला.
या प्रकरणाची हकीकत अशी की, साखर पेठ-बुधवार बाजारात इकरारअली मशिदीत १ डिसेंबर २०१५ रोजी बैठकीत सशस्त्र हल्ल्याचा प्रकार घडला होता. या मशिदीच्या विश्वस्तांमध्ये वाद प्रलंबित होता. हा वाद मिटविण्यासाठी मशिदीत शहर काझी अहमदअली सय्यद यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आली होती. आरोपी हे विश्वस्त नसताना मागील वर्षांपासून वर्गणी गोळा करतात, मशिदीच्या जागेत बेकायदेशीर बांधकाम करून तेथे भाडेकरू ठेवतात, त्याचा हिशेब कधीही देत नाहीत, असा आरोप जैनोद्दीन शेख व इतरांनी केला असता संतापलेल्या आरोपींनी, तुम्ही हिशेब मागणारे कोण, असे विचारत जैनोद्दीन शेख व इतरांवर दगड-विटांसह सळईने हल्ला केला. ही मारहाण थांबविण्यासाठी धावून आलेल्या जैनोद्दीनची वृध्द आई मुमताज यांनाही मारहाण केली. याप्रकरणी जैनोद्दीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या खटल्यात जिल्हा सत्र न्यायाधीश रेखा पांढरे यांनी गेल्या ७ फेब्रुवारी रोजी सर्व आरोपींना खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भा. द. वि. कलम ३०७ अन्वये दोषी धरून प्रत्येकी सात वर्षे सक्तमजुरीसह दंडाची शिक्षा सुनावली होती. रियाज ऊर्फ गियासोद्दीन अहमदसाहब रंगरेज, मतीन मुर्तूज नालबंद, अल्ताफ रफियोद्दीन वलमपल्ली, दाऊद अब्बास नालबंद, खलील ख्वाजादाऊद नालबंद , ए रजाक मेहबूबसाहेब मंगलगिरी , म. गौस खाजादाऊद नालबंद, जुबेर मेहमूद नालबंद, हरून रफीउद्दीन वल्लमपल्ली, म. कासीम म. शरीफ नालबंद, मैनोद्दीन म. शरीफ नालबंद, मेहमूद म. युसूफ नालबंद, फारूख अ. रजाक मंगलगिरी, हसन ऊर्फ सैफ अ. रजाक मंगलगिरी, आरीफ जिलानी नालबंद, इलियास अ. रजाक मुतवल्ली, सर्फराज म. शरीफ नालबंद (सर्व रा. शनिवार पेठ, सोलापूर) या आरोपींना शिक्षा सुनावल्यानंतर कारागृहात पाठविण्यात आले होते. परंतु या शिक्षेविरुध्द सर्व आरोपींनी ॲड. जयदीप माने यांच्यातर्फे मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. या अपिलातील प्राथमिक सुनावणी न्यायमूर्ती किशोर संत यांच्यासमोर झाली. आपिलातील जामीन अर्जावरील सुनावणीप्रसंगी आरोपींचे वकील ॲड. जयदीप माने यांनी आपल्या युक्तिवादामध्ये, खून करण्याचा आरोपींचा उद्देश नव्हता, बैठक संपल्यानंतर उशिरा वादातून सदरचा प्रकार घडलेला आहे, आरोपींविरुध्द खुनीहल्ल्याचा आरोप सिध्द होऊ शकत नाही, असा मुद्दा हा मुद्दा न्यायमूर्तींनी मान्य केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायमूर्तींनी १७ आरोपींची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी उच्च न्यायालयात सर्व आरोपींतर्फे ॲड. जयदीप माने व ॲड. पी. एम. ढालायत यांनी तर सरकारतर्फे ॲड. पी. पी. देवकर यांनी काम पाहिले.