MH 13 NEWS NETWORK
सोलापूर – गेल्या पंधरा दिवसांपासून तुळजापूर, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे एकरूख (ता. उत्तर सोलापूर) येथील हिप्परगा तलाव ८० टक्क्यांहून अधिक भरला आहे. पाण्याचा प्रवाह असाच सुरू राहिल्यास तलावातील पाणी सांडव्यातून वाहून शहरातील सखल भागांमध्ये शिरण्याची शक्यता असल्याने पाटबंधारे विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी, काटगाव, पिंपळा खुर्द, पिंपळा बुद्रुक, देवकुरळी, सुरतगाव, माळुंब्रा, सांगवी, वडगाव आदी भागांमध्ये तुफान पावसामुळे तेथील साठवण तलाव भरून वाहू लागले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी हिप्परगा तलावात दाखल होत आहे.

त्याचप्रमाणे, मार्डी, होनसळ, राळेरास, उळेगाव, गंगेवाडी, कासेगाव या उत्तर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यांतील गावांमधूनही मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. या सर्व प्रवाहामुळे हिप्परगा तलाव लवकरच पूर्ण क्षमतेने भरून त्याचा विसर्ग सांडव्यातून अनियंत्रितपणे होण्याची शक्यता आहे.
या पाण्याचा परिणाम म्हणून अवंती नगर, वसंत विहार, गुलमोहर अपार्टमेंट, तसेच जुना तुळजापूर नाका ते तळे हिप्परगा रस्ता, परुळ गार्डन ते पोपल वस्ती परिसर, जुना कारंबा नाका ते भोगाव बार्शी रोड या सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे. काही रस्ते व वाहतुकीचे पूल पाण्याखाली जाण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ढगफुटी सदृश पावसाचा फटका तामलवाडी परिसराला
२९ मे रोजी मध्यरात्री तामलवाडी व पंचक्रोशीतील भागात ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सर्व साठवण तलाव व पाझर तलाव भरून वाहू लागले आहेत. माळुंब्रा शिवारातील सांगवी साठवण तलावाचा सांडवाही सुटला असल्याची माहिती आहे. यामुळे तामलवाडीच्या दगडी पुलावरून दिवसभर पाणी वाहत होते.
सध्या तामलवाडी व परिसरातील ८ ते १० गावांतील तसेच उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील काही गावांतील पाणी थेट हिप्परगा तलावात येत आहे.
सतर्कतेचा सल्ला: पाटबंधारे विभागाच्या उपअभियंत्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, सखल भागांतील नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.