ठाणे, –लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी भारत निवडणूक आयोगाने घरुनच मतदान करण्यासाठी सोय उपलब्ध करुन दिली आहे. आजपासून गृहमतदानाला सुरूवात झाली असून 25 ठाणे लोकसभा मतदारसंघात 85 वर्षावरील एकूण 262 नागरिकांनी तर 38 दिव्यांग मतदारांनी गृहमतदान केले असल्याची माहिती 25-ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी दिली.
40 टक्के अपंगत्व (Locomotive) व 85 वर्षे वयावरील वृध्द यांच्याकरिता भारत निवडणूक आयोगामार्फत 12 D नमुना भरुन घरुनच मतदान करुन देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ज्या इच्छुक मतदारांनी लोकसभा निवडणूक 2024 ची अधिसूचना जाहीर झाल्यानंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे 12 D फॉर्म भरुन दिले त्यापैकी पात्र मतदारांनी टपाली मतपत्रिकेद्वारे आज आपला मतदानाचा हक्क बजावला.\
25-ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघात झालेल्या गृह मतदानाची आकडेवारी – 145 मिरा-भाईंदर (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-34, दिव्यांग मतदार-3 ) 146 ओवळा माजिवडा (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-46, दिव्यांग मतदार-16 ), 147 कोपरी पाचपाखाडी (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-22, दिव्यांग मतदार-4 ) 148 ठाणे (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-103, दिव्यांग मतदार-2 ), 150 ऐरोली (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-18, दिव्यांग मतदार-4 ) 151 बेलापूर (वय वर्षे 85 व त्यावरील मतदार-39, दिव्यांग मतदार-9)
ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण ८५+ वर्षावरील 27 हजार 325 मतदार आहेत. जे मतदार त्यांच्या वृध्दत्व व अंपगत्त्व यामुळे मतदान केंद्रावर येऊन मतदान करू शकत नाही, त्यांच्याकरिता ही सुविधा आहे. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत, हा यामागील भारत निवडणूक आयोगाचा उद्देश आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण 07 विधानसभा मतदारसंघात 85 वर्ष व त्याहून अधिक वय असलेल्या पुरुष मतदारांची संख्या- 15 हजार 21, महिला मतदारांची संख्या- 12 हजार 304 इतकी आहे. ज्या मतदारांनी भारत निवडणूक आयोगामार्फत 12 D नमुना अर्ज भरुन दिले आहेत, त्या मतदारांचे गृहमतदान करुन घेतले जाणार असल्याचे 25-ठाणे लोकसभा मतदार संघाच्यानिवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी नमूद केले.