मुंबई : महाराष्ट्र राज्याने वस्तू व सेवा कर संकलनात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात उच्चांक गाठलेला असून वस्तू व सेवा कर प्रणाली लागू झाल्यापासून पहिल्यांदाच रूपये ३ लक्ष कोटींचा टप्पा पार केलेला आहे. या वर्षी राज्याचे वस्तू व सेवा कर संकलन, रूपये ३.२ लक्ष कोटी एवढे झाले असून गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये १८ टक्के एवढी घसघशीत वाढ नोंदवलेली असल्याची माहिती मुंबईचे राज्यकर उपआयुक्त यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.
महाराष्ट्र राज्यातील वस्तू व सेवा कर संकलनाचा देशातील (रूपये २०.२ लक्ष कोटी) सकल वस्तू व सेवा कर संकलनातील वाटा १६ टक्के नोंदविला असून गतवर्षीच्या तुलनेत (१५ टक्के) त्यामध्ये सुमारे १ टक्का वाढ दिसून येत आहे. तसेच वस्तू व सेवा कर संकलनातील राज्याचा वाढीचा दर (१८ टक्के) हा देशाच्या सरासरी दरापेक्षा (१२ टक्के) अधिक आहे
.
राज्याच्या निव्वळ महसुलाचा विचार करता, राज्यास वस्तू व सेवा करातून रूपये १,४१,७०० कोटी एवढ़ा उच्चांकी महसूल मिळालेला असून त्यामध्ये राज्य व सेवा कर (SGST) रूपये ९३,४०० कोटी तर एकात्मिक करातील राज्याच्या वाट्यामधुन रूपये ४८,३०० कोटी एवढा महसुल प्राप्त झालेला आहे. राज्य वस्तू व सेवा कर महसुलात राज्याने गतवर्षीच्या तुलनेत २०.२ टक्के एवढी वृद्धी नोंदवलेली असून एकात्मिक करातील राज्याच्या वाट्यामध्येही २४ टक्के (मागील वर्षातील Ad hoc वगळता) एवढी वृद्धी दिसत आहे. पेट्रोल व मद्य उत्पादनावरील मूल्यवधीत कराचा महसूल रूपये ५३,२०० कोटी एवढा आहे.
वस्तू व सेवा कर, मुल्यवर्धित कर, व्यवसाय कर यांच्या एकंदरीत महसुलाचा राज्यातील वृद्धी दर हा ११ टक्के असुन तो सन २०२३-२४ या आर्थिक वर्षातील अंदाजित सकल राज्य उत्पादनातील वृद्धी दराहून (१० टक्के) अधिक आहे. एकंदरीत महसुल जमा ही २०२३-२४ साठी निर्धारीत अर्थसंकल्पीय अंदाज रूपये १.९५ लक्ष कोटीहून ही अधिक आहे.
महितीच्या विश्लेषणाच्या आधारे करण्यात आलेल्या धडक कारवायामध्ये अन्वेषण शाखेने जवळपास १२०० प्रकरणात २००० कोटी रूपयांचा महसुल गोळा करून दिलेला आहे. तसेच २४ प्रकरणात अटकेच्या कारवाया केल्या आहेत. अन्वेषण शाखेने गोळा केलेला महसुल हा आतापर्यंतच्या सर्व आर्थिक वर्षांतील सर्वाधिक आहे.