MH 13News Network
दक्षिण सोलापूर विधानसभा संवाद मेळावा उत्साहात
सोलापूर
विरोधक पंतप्रधान मोदींनी काय केले असे विचारत आहेत. मोदींनी 10 वर्षात हजारो कामे केली आहेत. 65 हजार शेतकर्यांना अनुदान दिले, मुद्रा योजनेतून सोलापुरातील अडीच लाख युवकांना कर्ज दिले, विडी कामगारांना 30 हजार घरे दिले, लाखो महिलांना उज्वला योजनेतून गॅस दिला अशी अनेक कामे मोदींनी केली. सर्वात महत्वाचे म्हणजे हिंदुत्वाचे आराध्य दैवत राम मंदिर बांधण्याचे काम केले, तुम्ही शहरातून अक्कलकोट, मंगळवेढा, पंढरपूर, विजापूरला जाता ना तो रस्ता मोदींनी केला, या शब्दात प्रणिती शिंदे यांना अस. राम सातपुते यांनी टोला हाणला.
आसरा चौकातील किल्लेदार मंगल कार्यालय येथे भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ दक्षिण सोलापूर विधानसभा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी आ. सातपुते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सुभाष देशमुख, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, मनिष देशमुख, तालुकाध्य रामप्पा चिवडशेट्टी आदी प्रमुख उपस्थित होते.
यावेळी आ. सुभाष देशमुख म्हणाले, आपल्या दक्षिण तालुक्याने मुख्यमंत्री दिला, पण किती विकास केला, 2014 पूर्वीचा काळ आठवा आणि आजचा काळ पहा. 10 वर्षातील विकास पहा. मोदी यांनी केलेली कामे प्रत्येक घरात, प्रत्येक माणयापर्यंत पोहचवा. मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करायचे आहे, त्यासाठी सोलापुरात राम सातपुते यांना मोठ्या मताधिक्याने दिल्लीला पाठवा. आगामी महिनाभर डोळ्यात तेल घालून प्रत्येकाने काम करा, असे आवाहन शेवटी आ. देशमुख यांनी केले.
नरेंद्र काळे म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर दक्षिणची जागा आनंदराव देवकते यांनी सोडली. मात्र पुढे शिंदे यांनी दक्षिण मतदारसंघाचे तुकडे करत धनगर समाजाचे नेतृत्व संपवण्याचे काम केले आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवून आता त्यांना धडा शिकवावा.
यावेळी सरचिटणीस शशिकांत चव्हाण, नियोजन समिती सदस्य डॉ. हविनाळे, अंबिका पाटील, अप्पासाहेब पाटील, मेनका राठोड, संगीता जाधव, विशाल गायकवाड, राम जाधव यांच्यासह प्रमुख पदाधिकारी बूथ वॉरियर्स यांची उपस्थिती होती. मेळाव्याचे सूत्रसंचालन विशाल गायकवाड यांनी केले.
जुलै महिन्यात विमानसेवा सुरू होईल…
होटगी रोड विमानतळासाठी केंद्राकडून निधी मिळाला आहे. काम सुरू आहे. जुलै महिन्यात विमानसेवा सुरू होईल, त्यावेळी तुम्हा कार्यकर्त्यांना मी विमानाने आयोध्येला नेईन, असेही आ. राम सातपुते म्हणाले.
दक्षिणमधून 50 हजारांचे मताधिक्य देऊः देशमुख
लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस झटावे. देशात पंतप्रधान मोदींनी केलेली कामे आणि दक्षिण तालुक्यात आ. सुभाष देशमुखांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवावीत. आपला विजय नक्की आहे. दक्षिणमधून निश्चित आ. सातपुते यांना 50 हजारांचे मताधिक्य देऊ, असे मनिष देशमुख यांनी सांगितले.