MH 13 News Network
उत्तर सोलापुरातील बाळेभागातील राजेश्वरी नगर येथील पाईपलाईनचे काम रखडल्याची बातमी प्रकाशित झाल्यानंतर आमदारांनी केलेल्या हस्तक्षेपानंतर महापालिका प्रशासनाने मक्तेदाराला नोटीस दिली आणि तातडीने कामास मुहूर्त लागला.
त्याचे झाले असे की…
उत्तर सोलापुरातील बाळे भाग हा भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथील अनेक नगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर देशमुख यांनी विकास निधी खर्च केला आहे. परंतु राजेश्वरी नगर भागात गेल्या दहा वर्षापासून रस्ता तसेच पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन करण्यात आली नव्हती. स्थानिक नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षात या नगरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाईप लाईन,नवीन रस्ते बांधणी, बोअरवेल, पेव्हर ब्लॉक , वृक्षारोपण असे कोणतेही काम केलेले नव्हते.यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या आधी आमदार विजयकुमार देशमुख यांनी या ठिकाणी लोखंडी पाईपलाईनसाठी साडेबारा लाख रुपयांचा निधी दिला. रस्ता मंजूर करण्याबद्दल येथील स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांची चर्चाही झाली होती. परंतु तरीही या ठिकाणी कोणतेही काम करण्यात आले नाही.
एम एच 13 न्यूजने या नगराच्या असुविधेबाबत बातम्या प्रकाशित केल्यानंतर आमदार देशमुख यांनी प्रशासनासोबत स्वतः येण्याचे आश्वासन दिले होते. याच दरम्यान पावसाळी अधिवेशन आल्यामुळे काम पुन्हा रखडले.
बातमीचा फॉलोअप घेतल्यानंतर आमदार देशमुख यांनी या भागातील त्यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते राजाभाऊ आलूरे, आनंद भवर यांना सूचना केल्या.
दरम्यान, आमदारांच्या हस्तक्षेपानंतर महापालिका प्रशासनाने पाईपलाईनचे काम करणाऱ्या मक्तेदाराला तातडीने नोटीस बजावली. आमदाराच्या विकास कामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांना आमदारांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनी सज्जड इशारा दिल्याचे समजते.त्यानंतर खडबडून जागे झालेल्या अधिकाऱ्यांनी बजावलेल्या नोटिसीमुळे मक्तेदार यांनी तातडीने पाईपलाईनचे काम सुरू केले आहे.

आज बुधवारी दुपारी राजेश्वरी नगर येथील पाईपलाईनचे काम सुरू केल्याचे आढळून आले. नगरातील रहिवाशांनी याबद्दल समाधान व्यक्त केले असून रस्त्याचे आणि स्वच्छतेचे काम लवकरात लवकर करण्याची मागणी केली आहे.
या ठिकाणी रस्त्याचे काम केलेले नसल्यामुळे पावसामुळे मोठ्या प्रमाणावर चिखल पसरतो. याच परिसरातील नागरिक, वाहनधारक मोठ्या प्रमाणावर घसरून पडले आहेत. पाईपलाईन नंतर रस्त्याचे काम तातडीने करावे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.