अमरावती जिल्ह्यात गावागावात ‘पिंक फोर्स’ पुढे येणार; मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार
अमरावती : महिला शक्ती ही कोणत्याही गोष्टीत परिवर्तन घडवून आणू शकते. महिलांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवल्यास जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी निश्चितच वाढेल त्यासाठी सर्व महिलांनी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रशासनामार्फत वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. जिल्हा आणि तालुका पातळीवर मतदान जनजागृती करण्यासाठी मतदार जागृती कक्ष स्थापन करण्यात आले असून गावागावात मतदार जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मोर्शी येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, एएनएम, शिक्षिका आणि बचत गटांची महिला यांचा ‘द पिंक फोर्स’ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते स्थापन करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.
मागच्या वेळीच्या लोकसभेच्या तुलनेत यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा स्तरावरून मतदारांना वेगवेगळ्या प्रकारे आकर्षित करण्यात येत आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून मतदार जनजागृती कक्षांची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक तालुका स्तरावर तालुका नोडल अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. जिल्हा कक्ष आणि चौदा तालुक्याचे टीम मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचा काम करत असून सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येत आहे. त्याचबरोबर सायकल रॅली, विद्यार्थ्यांची रॅली, विविध स्पर्धा, कॉलेज कॅम्पस ॲम्बेसिडरची नियुक्ती, सावली सभा, बस स्थानकावर जिंगल, जाऊ तिथे शपथ घेऊ, मतदानावर बोलू काही यासारख्या अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रमात आयोजन केले करण्यात आले असून यावर्षी मतदानाची टक्केवारी निश्चित वाढेल असा विश्वास श्री. कटियार यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आयोजनासाठी मोर्शीचे उपविभागीय अधिकारी प्रदीप पवार, मोर्शीचे तहसीलदार उज्वला ढोले, मोर्शीचे गटविकास अधिकारी देवयानी पोकळे, मोर्शीचे बालविकास प्रकल्प अधिकारी डॉ.नितीन उंडे, मोर्शीचे गटशिक्षणाधिकारी यांनी पुढाकार घेतला.